जातनिहाय जनगणनेला संघाचा हिरवा कंदील : विषय सरकारने गांभीर्याने हाताळवा
-अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी केली भूमिका जाहीर
प्रतिनिधी
पडक्कल : देशातील विशिष्ट जातींचा डाटा गोळा करण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अनुकूल असल्याचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी सोमवारी स्पष्ट केले. मात्र या माहितीचा उपयोग राजकारणासाठी न करता त्या समाजांच्या विकासासाठी केला जावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संघाच्या येथील तीन दिवसांची राष्ट्रीय समन्वय बैठकीचा समारोप सोमवारी झाला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेकर यांनी अनेक मुद्द्यांवर संघाची भूमिका स्पष्ट केली. हिंदू समाजामध्ये जाती आणि जातीय समीकरणे हा अतिशय नाजूक विषय आहे. मात्र देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी तो महत्त्वाचाही आहे. त्यामुळेच हा विषय गांभीर्याने हाताळला पाहिजे आणि केवळ निवडणुकीच्या राजकारणाचा आधार होऊ नये, असे आंबेकर म्हणाले. विरोधी पक्ष जातीनिहाय जनगणनेची मागणी सातत्याने करीत आहेत. या पार्श्वभूमीवर संघाची ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.
सर्वांचे कल्याण व्हावे… जे मागे आहेत, त्या समुदाय किंवा जातींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे संघाचे मत आहे. त्यासाठी सरकारला आकडे लागणार. ही सार्वत्रिक पद्धत आहे. असे आकडे पूर्वी घेतले आहेत, तरी पुन्हा गोळा करायला काय हरकत आहे?
– सुनील आंबेकर, अखिल भारतीय प्रचारप्रमुख, रा. स्व. संघ


