‘अब की बार चारशे पार’ चा नारा राज्यघटना बदलण्यासाठी
-विविध संघटना एकत्र
प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘अब की बार चारशे पार’ हा जो नारा दिला आहे, तो राज्यघटना बदलण्यासाठी आहे, असे सांगत त्याला विरोध करण्याकरिता महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, डावे, पुरोगामी साहित्यिक तसेच बिगरराजकीय संघटनांमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीत मतविभाजन टाळा आणि महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन त्यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.
कोणत्याही निवडणुकीत बहुमत मिळविण्याचा प्रत्येक पक्ष दावा करतो, परंतु भाजपचा चारशे पार म्हणजे चारशेपक्षा जास्त जागा मिळविण्याचा नारा कशासाठी तर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलायचे आहे, त्यामुळे या निवडणुकीत भाजपला रोखणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील लेखक, कार्यकर्ते, कलावंत पुढे सरसावले आहेत. या संदर्भात एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्यात आले आहे.


