शिंदे गटाचा हा नेता नाराज : भाजपाविरुद्ध उघड नाराजी

शिंदे गटाचा हा नेता नाराज : भाजपाविरुद्ध उघड नाराजी

– मुद्धा लोकसभा निवडणूक जागावाटपाचा

प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून अधूनमधून खटके उडताना दिसतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर संभाव्य जागावाटपावरुन नाराज असल्याचं वृत्त आहे.

महायुतीमधील जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यास लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. त्यावर शिंदे गटाचे खासदार गजनान कीर्तिकर यांनी तातडीने प्रतिक्रिया देताना जागावाटपाचे हे सूत्र मान्य नसल्याचे सांगितले. आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असेही ते म्हणाले.

महायुतीमधील संभाव्य जागावाटपाची आकडेवारी बुधवारी बाहेर आली. त्यानुसार भाजपला ३२, शिवसेनेला १२ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार असल्याचे समोर आले. याबाबत कीर्तिकर यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाराजी व्यक्त केली.

आम्ही काही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, असे ते म्हणाले. हे जागावाटप कुठून आले मला माहीत नाही. आमच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्हाला हे सूत्र मान्य नाही. २०१९ मध्ये आम्ही २२ जागा लढलो होतो, त्यात आम्ही ४ ठिकाणी हरलो. मग १२ जागा कशा घेणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.