… अखेर शिंदे सरकारचे ठरलंय : घटस्थापनेला होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
-भाजपाला आठ, सेना-राष्ट्रवादीला सहा मंत्रिपदे
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेच्या मुहूर्तावर मार्गी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत आधीच दिले होते. त्यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुक आमदारांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. या विस्तारात भारतीय जनता पक्षाला 8 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 6 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होताना केंद्र सरकारमध्ये 1 कॅबिनेट मंत्रिपद तर 2 राज्यमंत्रिपदांचे आश्वासन घेतले होते. या बाबतही अजित पवार आग्रही आहे. त्यामुळे केंद्राचा मंत्रिमंडळ विस्तार देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही सत्तेत जास्तीचा वाटा आहे. त्या संबंधी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याची सविस्तर चर्चा केल्याचीही माहिती आहे. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याही गटाला केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या पितृपंधरवडा सुरू आहे. त्यामुळे या बाबतची घोषणा होणार नाही. पितृपंधरवाडा संपताच 15 किंवा 16 ऑक्टोबरला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. सध्या भाजप, शिवसेना यांचे प्रत्येकी 10 मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसेच्या वतीने एका मोठ्या नेत्यासाठी एक खाते रीक्त ठेवले आहे. यात जयंत पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. त्यांचा सत्तेत प्रवेश शपथविधीसह होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारात आपल्याला संधी मिळेल, या आशेमुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विस्तारात कोणाला संधी मिळेल, हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे शिंदे गटातील अस्वस्थता गेले काही दिवस वाढत चालली आहे.


