घणाघात : या नेत्याने म्हटले, संभाजी भिडेंची बोलण्याची औकात आहे का?

घणाघात : या नेत्याने म्हटले, संभाजी भिडेंची बोलण्याची औकात आहे का?

-अशा प्रकारची टीका लांच्छनास्पद

प्रतिनिधी
नागपूर : महात्मा गांधींविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याने संभाजी भिडेंविरोधात राज्यभरात काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही भिडेंवर घणाघाती शब्दांत टीका केली आहे. ‘गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का?, हा आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा. हा बिनअकलेचा मनोहर भिड्या महात्मा गांधींवर अशा प्रकारची टीका करत असेल तर ते लांच्छनास्पद आहे’, असा हल्लाबोल वडेट्टीवार यांनी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यात आधी हा संभाजी नाही. संभाजी याचे टोपणनाव आहे. हा मनोहर भिडे आहे. मराठा आणि बहुजन समाजाच्या तरूणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली विष पेरण्याचे काम हा संभाजी भिडे करतो. महात्मा गांधींच्या विरुद्ध बोलण्याची याची औकात आहे का? आईन्सटाइन म्हणतात की, महात्मा गांधी हे केवळ हाडामासाचा माणूस नव्हता, तर ते विचारांचे प्रतीक होते. गांधींजींच्याच विचाराने दक्षिण आफ्रिकेपासून भारतापर्यंत अहिंसक आंदोलने झाली आणि अनेक लोकांना न्याय मिळाला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, आंबे खाल्ल्याने मुलगा होतो म्हणणारा हा भिडे. हा बिनअकलेचा मनोहर भिड्या महात्मा गांधींवर अशा प्रकारची टीका करत असेल तर ते लांच्छनास्पद आहे. भिडे अशी विधाने करून जातीय तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे सरकारने भिडेवर तत्काळ कारवाई करावी. गुन्हे दाखल करावे. हा मोकाट फिरता कामा नये. राष्ट्रपित्याचा, महात्मा गांधींचा अपमान केल्यामुळे आम्हीसुद्धा ठिकठिकाणी भिडेंविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत.

विजय वडेट्टीवार म्हणाले, सगळ्यात आधी माझी माध्यामांना विनंती आहे की, भिडेचे खरे नाव सांगा. त्याचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असे काही तरी आहे. हा संभाजी महाराजांचे नाव स्वत:ला का लावतो? स्वत:च्या प्रतिष्ठानला शिवाजी महाराजांचे नाव का लावतो? हे सगळे करून इकडे येऊ दंगल पसरविण्याचे काम का करतो? 2024 चा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे प्रकार सुरू आहेत. ही RSS ची विकृत विचारधारा आहे.

यशोमती ठाकूर यांनीही संभाजी भिडेंवर घणाघाती टीका केली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भिडेवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून तडीपार केले पाहिजे. सरकार कोणत्या विचारधारेला बांधलेले आहे?