हे काय चाललंय :१९ वर्षांत १३२६ आमदार, खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे
-पुणे येथील एका संस्थेचा धक्कादायक अहवाल
प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात 2004 ते 2023 या काळात निवडून आलेल्या 1326 आमदार आणि खासदारांकडे सरासरी संपत्ती 10 कोटी रुपये इतकी आहे. तर तर त्यातील 40 आमदार हे अब्जाधीश आहेत. तर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक लोकप्रतिनिधींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी धक्कादायक माहिती एका अहवालातून उघड झाली आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या संस्थेने 2004 पासून दोन दशकाच्या काळात विधानसभा, लोकसभा आणि पोटनिवडणुकीत निवडणूक लढविलेल्या राज्यातील 14,117 उमेदवार आणि निवडणुकीत जिंकलेल्या लोकप्रतिनिधींचा अभ्यास करून नुकताच अहवाल सादर केला.
या संस्थेचे सहसंस्थापक अजित रानडे म्हणाले की, गंभीर गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांना निवडणुका लढविण्यास रोखण्यासाठी कायद्याची गरज आहे. रानडे हे पुण्यातील गोखले इन्टिट्यूट ऑफ अँड इकॉनॉमिक्सचे कुलगुरू आहेत.
या अहवालात म्हटले आहे की, ‘सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले 227 लोकप्रतिनिधी हे भाजप पक्षाचे आहेत. तर शिवसेनेचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले 200 लोकप्रतिनिधी गेल्या दोन दशकात निवडून आलेले आहेत.
भाजपकडून निवडून आलेल्या उमेदवारांकडे सरासरी संपत्ती ही 14.39 कोटी रुपये आहे. तसेच जिंकून आलेले 10 उमेदवार अब्जाधीश आहेत.
रानडे पुढे म्हणाले, आमच्या अहवालाचा उद्देश हा आहे की, मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळावी. मतदारांमध्ये जागृकता निर्माण व्हावी. जेणेकरून आगामी निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे नेते रिंगणात उभे असलेले दिसतील. आजकाल निवडणुकीत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. तसेच उमेदवारांकडून प्रसिद्धी मिळविण्यासाठी खोट्या बातम्या, द्वेषयुक्त भाषणाचा आधार घेतला जातो.
-कॉंग्रेसच्या 95 जणांवर गुन्हे
दरम्यान, भाजपचे 2004 या वर्षापासून निवडून आलेल्या 386 खासदार आणि 227 आमदारांवर गुन्हे दाखल आहे. तर काँग्रेसच्या 2004 पासून निवडून आलेल्या 267 लोकप्रतिनिधींपैकी 95 जणांवर गुन्हे दाखल आहेत.
– सेनेच्या 200 जणांवर गुन्हे
तसेच शिवसेनेच्या 283 पैकी 200 लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर राष्ट्रवादीच्या 250 लोकप्रतिनिधींपैकी 107 लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल आहेत. तर 63 पैकी 41 अपक्ष लोकप्रतिनिधींवर फौजदारी खटले दाखल झालेले आहेत.


