काँग्रेसचे हे नेते म्हणतात, वंचितला सोबत घ्यावे लागेल
-समविचारी पक्षांची मोट बांधणे अनिवार्य
प्रतिनिधी
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना 15 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. वंचितसारख्या समविचारी पक्षांची मोट बांधणे आता अनिवार्य झाले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत जायला आम्ही तयार आहोत अशी माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस तयार आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. कमकुवत असलेले तयारी करतात आणि मजबूत असलेले सदैव तयारच असतात. सामान्यांच्या प्रतिक्रिया राजकारण्यांच्या तोंडात शेण घालणाऱ्या आहे. त्यांनी राजकारण एवढे नासवले की, आज आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटत आहे. पण अशा स्थितीत काँग्रेसवरील जनतेचा विश्वास वाढतो आहे. बरीच मंडळी काँग्रेसमध्ये येणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर जनसामान्यांच्या प्रतिक्रिया नेत्यांच्या तोंडात शेण घालणाऱ्या आहेत. केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांनी राजकारण ऐवढे नासवले आहे की, आम्हाला आमदार म्हणवून घ्यायला लाज वाटते. काँग्रेस फुटणार नाही असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. विरोधी पक्ष नेते पद आमदारांच्या संख्याबळावर ठरणार आहे. ज्या पक्षाचे आमदार अधिक, त्याच पक्षाला विरोधी नेते पद मिळेल, काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले तर पक्षाचे ज्येष्ठ नेते हे पद कोणाला द्यायचे हे ठरवतील.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झालेले आहेत. पवार सहभागी होताच सरकारमध्ये वादांना तोंड फुटले आहे. त्यांचेच आमदार नाराज आहेत. काही लोकांनी नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांच्या आमदारांना सांभाळायचे असतील, तर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या 400 जागा कराव्या लागणार आणि लोकसभेच्या 100 जागा तयार कराव्या लागतील, अशी मिश्कील टिपणी वडेट्टीवार यांनी केली.


