धोका नाही; विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद तूर्तास कायम

धोका नाही; विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेतेपद तूर्तास कायम

-कायंदेंची पक्षातून  अद्याप हकालपट्टी नाही

प्रतिनिधी
मुंबई : उद्धवसेनेच्या (शिवसेना ठाकरे गट) विधान परिषदेतील आमदार अॅड. मनीषा कायंदे यांनी शिवसेनेच्या ५७ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला. परिणामी, ठाकरे गटाचे विधान परिषदेतले बहुमत घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येईल, अशी चर्चा रंगली आहे. मात्र कायंदेंची पक्षातून हकालपट्टी झालेली नाही. त्यामुळे त्या विधिमंडळाच्या लेखी ठाकरे गटाच्या आमदार असून विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला धोका नसल्याचे विधिमंडळातील सूत्रांनी सांगतले.

विधान परिषदेत ठाकरे गटाचे ११ आमदार आहेत. ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार विप्लव बजोरिया यांनी यापूर्वी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. आता अॅड. कायंदेंनी जय महाराष्ट्र केल्याने उद्धवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ ९ वर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेही संख्याबळ ९ इतके आहे. ज्यांचे संख्याबळ अधिक त्याचा विरोधी पक्षनेता, असे अजित पवार यांनी आज स्पष्ट केले. त्यामुळे अंबादास दानवेंचेे विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आहे का, अशी माहिती घेतली. तेव्हा ‘कायंदेंचे पक्षसदस्यत्व कायम ठेवले आहे. त्या अजून ठाकरे गटाच्या आमदार आहेत’, असे विधिमंडळातून सांगण्यात आले. म्हणून विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला इतक्यात मिळणार नाही, असे दिसत आहे.

विधान परिषद बलाबल

}भाजप २२ }उद्धवसेना ११ }राष्ट्रवादी ९ }काँग्रेस ८ }जेडीयू १ }रासप १ }शेकाप १ }अपक्ष ४ }एकूण ५७ }रिक्त जागा २१ }सभागृहाची संख्या ७८.

आणखी एक धक्का बसण्याच्या तयारीत

विधान परिषदेत चार वेळा आमदार राहिलेला उद्धवसेनेचा आणखी एक आमदार लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. या आमदाराच्या स्वयंसेवी संस्थांच्या निधीचे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती लागलेले आहे. त्यामुळे तो पक्षांतर करेल. त्यानंतर उद्धवसेनेची मोठी पंचाईत होईल, असा दावा केला जात आहे.

  • विधान परिषदेत शिवसेनेत फूट पडलेली नाही. वरच्या सभागृहात (ज्येष्ठ सभागृह) शिवसेना नावाचा एकच पक्ष आहे. एखाद्या सदस्याने पक्षादेश (व्हीप) मोडला म्हणून सभापतींकडे पक्ष तक्रार करत नाही तोपर्यंत अशा सदस्यांचे सदस्यत्व अबाधित राहते. कायंदे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) पक्षांतर केले आहे. विधिमंडळाच्या लेखी मात्र त्या शिवसेना आमदार आहेत. आमदार विप्लव बाजोरिया यांच्यासंदर्भात असा प्रकार आहे. त्यामुळे विधानपरिषदेत अजूनही शिवसेनेचे ११ सदस्य आहेत. परिणामी, शिवसेनेकडेच विरोधी पक्षनेतेपद कायम राहील, असे विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी सांगितले.