असं काय घडलं? त्या बंद खोलीत, सर्व म्हणतात, आमच्यात नाराजी नाही

असं काय घडलं? त्या बंद खोलीत, सर्व म्हणतात, आमच्यात नाराजी नाही

-कल्याणच्या जागेवर भाष्य करण्याचे टाळले

प्रतिनिधी
ठाणे : एकनाथ शिंदे, त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत व फडणवीसांची गुरुवारी सायंकाळी ‘सह्याद्री’वर बंदद्वार चर्चा झाली. बैठकीला केवळ हे तिघेच उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, कल्याण लोकसभेच्या जागेवर भाजपने केलेला दावा व वादग्रस्त जाहिरातीचा खटाटोप यावरून उद‌्भवलेल्या नाराजीवर चर्चा होऊन आता वादावर पडदा टाकण्यावर तिघांचेही एकमत झाल्याचे समजते. ‘कल्याण’वर भाजपने दावा केल्यामुळे श्रीकांत खूप नाराज होते. भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शिंदे समर्थकांचा जास्त रोष होता.

त्यातच आमदार संजय केळकरांनी ठाणे-पालघरही आमचेच, असा दावा ठोकल्याने रोष वाढतच गेला. या सर्व घटनांबाबत शिंदे पिता-पुत्रांनी फडणवीसांशी चर्चा करून शंकांचे निरसन करून घेतले. ‘वादग्रस्त जाहिराती’सारखा खटाटोप कुणी करू नये, युतीत मिठाचा खडा पडेल असे वक्तव्यही करू नये, अशी हमी दोन्ही गटांनी एकमेकांना दिली. असे असले तरी शिंदे गटाचा चव्हाणांवर अजूनही रोष दिसून येतो.

शिंदेसेना-भाजपमध्ये एक-दोन नंबरसाठी शर्यत नाही. दोन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. जेव्हा आम्ही दोन्ही पक्ष एकत्र काम करू तेव्हाच विकासकामांना गती मिळेल, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना सांगितले.

कल्याण, ठाणे आणि पालघर लोकसभेविषयीच्या वादावर बोलणे त्यांनी टाळले. पक्षवाढीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की, ‘शाखा संपर्क अभियान दौरा’च्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क साधून ग्राउंड रिअ‍ॅलिटी जाणून घेण्यास मी प्राधान्य देत आहे. कुर्ला, गोरेगाव येथील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. १९ जून रोजी शिवसेनेच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम आम्ही मोठ्या थाटात साजरा करणार आहोत. महापालिका निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच होतील. जुलैमध्ये याविषयी न्यायालयाचे आदेश अपेक्षित असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

शिंदेसेना-भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या वादाविषयी डॉ. शिंदे म्हणाले की, कोणी काही बेजबाबदार विधान केले. बोलले तर काही गोष्टी तयार होत असतात. ही वस्तुस्थिती आहे. तरीही दोन्ही पक्षांमध्ये अतिशय उत्तम समन्वय साधला जात आहे.