काय सांगता : वज्रमूठ सभेत पवारांचे भाषण नाही

काय सांगता : वज्रमूठ सभेत पवारांचे भाषण नाही

-भाजपच्या जवळीकीशी चर्चा
प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेव6क संघाच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तडाखेबंद भाषण ठोकणारे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाषण करणार नसल्याचे समजते. भाजपच्या जवळीकीमुळे ते या सभेत बोलणार नाहीत, अशी चर्चा रंगली आहे.

नागपूरमध्ये होणाऱ्या वज्रमूठ सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच या सभेत प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील, हे आवर्जुन सांगितले.

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभास्थळाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाहणी केली. या सभेला जवळपास एक लाख लोक जमतील, असा दावा त्यांनी केला. त्यामुळेच भाजपकडून या सभेला विरोध सुरू आहे. या सभेची त्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी हे प्रकरण कोर्टातपर्यंत नेले असल्याचे ते म्हणाले. तसेच सभास्थळी प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील, ही माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा ठाकरे गट आहे. या प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांची भाषणे होतील. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काटोलचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख बोलणार असल्याचे समजते. त्यामुळे अजित पवार या सभेलाही उपस्थित राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आत्ताच मला इथले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सांगत होते की, अजित पवार सकाळी नऊच्या विमानाने निघणार आहेत. दहा-साडेदहा वाजता ते नागपुरात येणार आहेत. तसा कार्यक्रमही त्यांनी पक्षाकडे पाठवला आहे. त्यामुळे या चर्चेपेक्षा शेतकऱ्यांचे, तरुणांचे, गरिबीचे, महागाईचे, देश सुरक्षित नाही या प्रश्ंनाना पेव फुटले आहे. याकडे थोडे लक्ष घालावे, असे मला वाटते.

खासदार संजय राऊत म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार उद्याच्या सभेला येणार आहेत. जंयत पाटील येत आहेत. इकडले राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातले महत्त्वाचे प्रमुख नेते अनिल देशमुख आहेत. मला वाटते की जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांचे भाषण होईल. मात्र, तो त्या पक्षाचा निर्णय आहे तो.

नागपूर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला. भारतीय जनता पक्षाचा गड. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची भूमिका डळमळीत झालेली दिसते. स्वतः शरद पवारांनी उद्योगपती अदाणींची पाठराखण करत त्यांच्या जेपीसी चौकशीची गरज नसल्याचे सांगितले. मात्र, विरोधकांमधून टीकेचा स्वर तीव्र होताच, या चौकशीला विरोध नसल्याचे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची डिग्री पाहून लोकांनी त्यांना निवडून दिले नसल्याचे म्हणत अजित पवारांनी त्यांची पाठराखण केली. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा आल्या. त्यासाठी त्यांनी प्रकृतीचे कारण दिले. मात्र, लगेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणी क्लिनचीट मिळाल्याची बातमी आली. या साऱ्यांमुळे अजित पवार उद्या बोलणार नसल्याची चर्चा रंगली आहे.