या नेत्याच्या घिसाडघाईच्या भूमिकेमुळे पडले महाविकास आघाडीचे सरकार
– उद्धव सेनेच्या नेत्याचा दावा
प्रतिनिधी
मुंबई : नाना पटोलेंमुळेच महाविकास आघाडीचे सरकार पडले, असा खळबळजनक दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. तसेच, नाना पटोले–बाळासाहेब थोरात वाद चिघळू नये, अशी अपेक्षाही शिवसेनेने व्यक्त केली आहे.
टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये, असे शिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये आज म्हटले आहे.
–यावर फार काय बोलावे
नानासाहेब पटोले-बाळासाहेब थोरात वादावर अग्रलेखात म्हटले आहे की, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते. संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशावेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे?
–पटोलेसोबत काम करणे कठीण
अग्रलेखात म्हटले आहे की, थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे सांगून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोंड फुटले. थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे. थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळय़ात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत.
-ज्येष्ठता असूनही अपमानित केले
अग्रलेखात म्हटले आहे की, पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर 2024 साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर 2024 आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे, असे एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेच आहे. भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व बनवलेले कार्यकर्ते उचलूनच स्वतःच्या इमारतीचे इमले रचत आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.


