वाचा काय आहे प्रकरण: पीएम मोदी यांच्या जीवाला धोका

वाचा काय आहे प्रकरण: पीएम मोदी यांच्या जीवाला धोका

मुंबईच्या सभेत दोन शस्त्रधारी शिरले

-एनएसजी कमांडो म्हणून मिरवीत होते

प्रतिनिधी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याचे कारण म्हणजे मुंबईतल्या ज्या बीकेसी मैदानावर त्यांची सभा झाली, तिथून दोन संशयितांना पोलिसांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडे प्राणघातक शस्त्रे मिळाली आहेत.

रामेश्वर मिश्रा आणि कटराम कावड अशी त्यांची नावे आहेत. यातल्या एकाकडे स्मिथ अँड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड सापडल्याचे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी मुंबईत सभा झाली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेत सत्ता देण्याचे आवाहन दिले. या सभेला लाखो लोकांची उपस्थिती होती. मात्र, यातून दोन संशयितांना शस्त्रासह पोलिसांनी पकडल्यामुळे खळबळ उडाली आहे. रामेश्वर मिश्रा या संशयिताने आपण लष्कराच्या ‘गार्ड्स रेजिमेंट’मधील नाईक असल्याची थाप मारून सभास्थळी ‘व्हीव्हीआयपीं’च्या जागी प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात होता.
मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना मिश्राच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी रामेश्वर मिश्रावर बराचवेळ नजर ठेवली. त्याने गळ्यात एलिट नॅशनल सिक्युरिटी गार्डचे ओळखपत्र घातले होते. त्यावर त्याला ‘रेंजर’ म्हणून तैनात केल्याचे लिहिले होते, तर ओळखपत्राच्या रिबिनवर ‘दिल्ली पोलीस सुरक्षा (PM)’ असे लिहिल्याचे समोर आले आहे.
मिश्राला पोलिसांनी हटकले. तेव्हा त्याने आपण ‘एनएसजी’च्या पठाणकोट हबमध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याचे गळ्यातले आयकार्ड बनावट असल्याचे समजले. त्याच्यावर आयपीसी कलम 171, 465, 468 आणि 471 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, वांद्रे कोर्टाने त्याची 24 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
अटक केलेल्या दुसऱ्या संशयिताचे नाव कटराम चंद्रगाई कावड असून, तो भिवंडीचा रहिवासी आहे. कटराम एका हॉटेल आणि ट्रान्सपोर्टसाठी काम करतो. तो मोदी यांच्या सभेला आला होता. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे स्मिथ अँड वॅगन स्प्रिगफिल्ड रिव्हॉल्व्हरसह चार राऊंड सापडले. कटरामविरोधात बीकेसी पोलिस ठाण्यात कलम 37(1), 135 मापोका 1951 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे.