मालिकांना मिळणार जामीन : आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मालिकांना मिळणार जामीन : आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

-मुंबईतील मालमत्तांशी संबंधीत प्रकरणात अटक

प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवाब मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधीत आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मनी लॉड्रिंगप्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांनाही दिलासा मिळणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे.

न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

दरम्यान, नवाब मलिक यांनी यापूर्वी जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला होता. तसेच, 6 जानेवारीरोजी झालेल्या सुनावणीत नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर नवाब मलिकांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी मागणी नवाब मलिक यांच्या वकिलांनी केली आहे.

दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्हापासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असल्याचे सांगत ईडीने नवाब मलिक यांच्या जामिनाला विरोध केला आहे.

-नवाब मलिकांवर खासगीत उपचार

दरम्यान, नवाब मलिक हे गेल्या काही दिवसांपासून मुंबई उपनगरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. नवाब मलिक यांच्या वकिलाने न्यायालयाला विनंती केली आहे की, प्रकृतीच्या कारणास्तव नवाब मलिक यांच्या जामिनावर तातडीने सुनावणी घ्यावी. गेल्या सुनावणीत न्यायालयाने ईडीला नवाब मलिक यांच्या प्रकृतीच्या स्थितीबाबत 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात आज सुनावणीदरम्यान ईडीकडून नवाब मलिक यांच्या प्रकृतीबाबत काय अहवाल सादर केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नोव्हेंबर 2021 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिकांवर गंभीर आरोप लावले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नवाब मलिकांच्या कंपनीने अशा लोकांकडून जमीन खरेदी केली आहे. जे 1993 च्या मुंबई ब्लास्टमध्ये आरोपी आहेत. ही जमीन दाऊद इब्राहिमशी संबंधीत आहे. तसेच, नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध आहे.

11 कोटींची संपत्ती जप्त

ईडीच्या माहितीनुसार मलिकांची जवळपास 11 कोटी 70 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मलिकांची सॉरीडोस नावाची कंपनी आहे. ईडीने चौकशी केली असता संबंधित संपत्ती आणि पैशांचा संबंध हा दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत येतोय. तिथून हे सगळे पैसे आले असून त्यातून ही संपत्ती घेतली गेल्याचा दावा आणि आरोप ईडीने केला आहे. मरियम गोवाला नावाच्या महिलेची संपत्ती हडप केल्याचा आरोप नवाब मलिकांवर करण्यात आला आहे.

-मलिकांची ही संपत्ती ईडीकडून जप्त

कुर्ल्यातील गोवावाला कंम्पाऊंड जप्त

कुर्ला पश्चिमेतील व्यावसायिक जागा ईडीकडून जप्त

उस्मानाबादमधील मलिकांची 148 एकर जमीन जप्त

कुर्ला पश्चिमेतील 3 फ्लॅट्स जप्त

वांद्रे पश्चिमेतील 2 राहती घरंही ईडीकडून जप्त