कुणी दिले 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना ?

कुणी दिले 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना ?
-सरकारला ‘एसआयटी’ स्थापन करायची खाज
-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सरकारचा बोहणीचा भ्रष्टाचार केलाय. त्यांनी गरिबांच्या वाट्याचे तब्बल 110 कोटींचे भूखंड 2 कोटींना दिले. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेची फसवणूक आहे, असा घणाघात शनिवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते नवी दिल्लीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सरकारला ‘एसआयटी’ स्थापन करायची खाजय. त्यामुळं त्यांनी खोकेवाल्या आमदारांची ‘एसआयटी’ चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.

राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत. आम्ही केंद्रातल्या लोकांना कागदपत्रे पाठवलीयत. अनेक केंद्रीय तपास यंत्रणांकडे कागदपत्रे पाठवली आहेत. देवेंद्र फडणवीस इथे का आले माहित नाही. मात्र,110 कोटींचे भूखंड आपल्या मर्जीतल्यांना 2 कोटींना दिले. गोरगरिब आणि झोपट्टीधारकांचे 16 भूखंड होते. या बद्दल न्यायालयानेही ताशेरे ओढले. मात्र, निर्णय फिरवल्यावर आता न्यायालयाचे समाधान झाले असेल. या साऱ्या प्रकारावर अण्णा हजारे गप्प का, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा हा भोवनीचा भ्रष्टाचार आहे. यावर कोणीच बोलत नाही. गरिबांना घरे मिळाले नाहीत. उपमुख्यमंत्री सारवासारव करतायत. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक असल्याची टीका त्यांनी केली.

-पोलिस यंत्रणेचा गैरवापर
संजय राऊत म्हणाले की, ज्या पद्धतीने पन्नास खोके फोडण्यात आले, तो काय व्यवहार होता? जे विषय पोलिस, ‘सीबीआय’ने संपवले, त्यावर ‘एसआयटी’ स्थापन करून सत्तेचा, पोलिस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. आम्ही तपासायला सामोरे जायला तयार आहोत. त्यामुळे तुम्ही तोंडावर पडाल. आम्हीही नागपुरात जातोय. तुमचे विषय समोर आणू. त्यावरही ‘एसआयटी’ स्थापन करा, असे आव्हान त्यांनी दिले.

-कोणीही करतो ‘एसआयटी’ची मागणी
सरकारला ‘एसआयटी’सरकारला स्थापन करायची खाज आहे. खाजवत बसा. उठसूठ ‘एसआयटी’ स्थापन करून. मात्र, त्यामुळे पोलिसांचे महत्त्व कमी होतेय. विधानसभेत कोणीही उठतो आणि ‘एसआयटी’ची मागणी करतो. दुसऱ्याची बदनामी करण्यासाठी हे शस्त्र वापरणे सुरूय. या अग्निदिव्यातून आम्ही बाहेर पडू आणि महाराष्ट्र पुन्हा प्रकाशमान करू, असा आशावादही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

-महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार
संजय राऊत पुढे म्हणाले, ‘एसआयटी’ स्थापन करून, बदनामी करून शिवसैनिकांचे मनोधैर्य खच्ची होईल या भ्रमात ते आहेत. मात्र, शिवसेना उसळून बाहेर पडेल. अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले, आता ते अदृश्य झालेत. महाराष्ट्रात भ्रष्ट मार्गाने सरकार आले. त्याला त्यांनी जाब विचारल्याचे दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंकाय. देशभरात केंद्र सरकार अनेक सरकार विकत घेतंय. अण्णांनी लोकपाल, लोकायुक्त आणण्याबद्दल आवाज उठवला. त्यांच्याकडून लोकांना आशा होत्या, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

-नाइट लाइफला विरोध करणारे कुठंय
राऊत म्हणाले, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी मॉल आणि मोठ्या स्टोरअरमधून वाइन विक्रीची परवानगी देण्यात आली. मात्र, त्या निर्णयाला विरोध केला. आता सरकार तेच धोरण घेऊन पुढे येतेय. नाइट लाइफला विरोध करणारे आशिष शेलार कुठंयत. हे दुतोंडी नाग, साप आहेत. ते दोन्ही बाजूने वळवळतात.

-भारत जोडो यात्रेसाठी कोरोना
संजय राऊत पुढे म्हणाले की, राहुल गांधीची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरूयत. कोरोनाची भीती दाखवतायत. रूट बदलवतायत. एक तरुणा नेता द्वेष, सूडाविरुद्ध देश जोडण्याची भाषा करतोय. भाजपने त्यांचे स्वागत केले पाहिजे. मोठी तपश्चर्या असल्याशिवाय कुठलाही तरुण नेता चालू शकणार नाही. हा इव्हेंट नाही. लोक स्वतःहून यात्रेत सहभागी होतायत.

-भारत जोडो राजकारणापलीकडील
राहुल गांधींच्या यात्रेकडे राजकारणापलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. ते दिल्लीत येतील. येथून यात्रा जगभर पोहचेल. जग त्यांची दखल घेईल. आठ दिवसांनी यात्रा पुन्हा सुरू होईल. काश्मीरमध्ये आम्ही काही लोक सहभागीच होऊ. रामसेतू भाजपचा प्रचाराचा मुद्दा होता. काय झाले? अचानक रामसेतूचे अस्तित्व नष्ट कसे झाले? हे लोक प्रभू श्रीराम नाही म्हणतील, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.