या मंत्र्यांना हाकला, नाहीतर सरकारची चौथी घंटा वाजेल
-महाराष्ट्राच्या माथी महादळभद्री प्रयोग
-‘सामना’तून वाचाळवीरांवर जळजळीत टीका
प्रतिनिधी
मुंबई : अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत जनता जोडेफेक करू लागली आहे. हा महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे. या मंत्र्यांना हाकला, नाहीतर सरकारची चौथी घंटा वाजायला लागेल, अशा शब्दांत आज, बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने कृषिमंत्री अब्दुल सत्तार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर तोफ डागली.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात म्हटले की, अब्दुल सत्तार हा काही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा समाजकारणात दखल घ्यावी, असा माणूस नाही. मराठवाड्यातील सिल्लोडचा हा बेडूक इकडून तिकडे सोयीनुसार उड्या मारतो. सोयीनुसार डराव डरावही करतो. त्याच्या तोंडातून नेहमीच गटाराचा मैला वाहत असतो. महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला ते शोभणारे नाही.
-सत्तार बेताल वक्तव्य करीत सुटला
शिवसेनेने म्हटले की, अब्दुल सत्तार यांच्या एका गलिच्छ, बेशरम वक्तव्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना या अब्दुल्लाने आपल्या तोंडाचे गटार असे उघडले की, त्यातून फक्त दुर्गंधीच बाहेर पडली. अब्दुल सत्तार हे मिंधे गटाचे जाणते सरदार असून त्यांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृषी मंत्रीपदाची झुल टाकली आहे. सध्या अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीची अवस्था दारुण आहे. अशा वेळी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी हा माणूस आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अशांवर बेताल वक्तव्य करीत सुटला आहे.
– असे मंत्रिमंडळात काय कामाचे
शिवसेनेने म्हटले की, सुप्रिया सुळे यांच्याबाबत सत्तार यांनी ज्या शिवराळ भाषेचा वापर केला. तो सर्व प्रकार महाराष्ट्राच्या प्रतिमेस काळिमा फासणारा आहे. राज्यात ठिकठिकाणी सत्तार यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहे. सवित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ अशा महान स्त्रियांचा वारसा सांगणारे हे महाराष्ट्र राज्य आहे. सुप्रिया यांच्याविषयी बेशरमपणाचे वक्तव्य करताना अब्दुल्लांची जीभ झडली कशी नाही? अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्याने महाराष्ट्रात असंतोषाची ठिणगी पडली आहे. त्याच अब्दुल्लांच्या गळ्यात गळा घालून मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सिल्लोड येथे मिरवित होते. ‘‘सत्तार यांनी काय घाण शब्द वापरून महिलांचा अपमान केला, हे आपणास माहीत नाही.’’ अशा काखावर करून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव सिल्लोडला त्याच सत्तारांचा पाहुणचार घेत रमले. महाराष्ट्रावर कोणत्या हैवानांचे राज्य आले. ते यावरून दिसते. सत्तार यांना एक क्षणही मंत्रिमंडळात ठेवू नये असा हा सर्व प्रकार आहे.
-सत्तारांकडून सुळे यांना शिवीगाळ
शिवसेनेने म्हटले की, सुप्रिया सुळे या शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात असे काय म्हणाल्या की, ज्यामुळे सत्तारांनी सुळे यांना शिवीगाळ करावी? ‘महाराष्ट्रातील काही आमदारांनी पन्नास पन्नास खोके घेतल्याचे बोलले जाते. एकाही आमदाराने ‘आम्ही खोके घेतले नाही,’ असे समोर येऊन सांगितले नाही. याचा लोकांनी काय अर्थ घ्यावा?’ अशा प्रकारचे विधान सुळे यांनी केल्याने सत्तार यांच्या धोतराला आग लागण्याचे कारण नव्हते. सत्तार उलट म्हणाले, ‘‘सुप्रियाताईंना हवे असतील तर त्यांनाही खोके देऊ.’’ म्हणजे सत्तार यांच्या टोपीखाली खोके आहे.
-शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख
शिवसेनेने म्हटले आहे की, जळगावचे खोकेबाज ‘टाईट’ मंत्री गुलाबराव पाटील यांचाही फक्त तोलच गेला नाही तर ते झोकांड्या जाताना दिसत आहेत. शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांचा उल्लेख या खोकेबाज गुलाबरावाने ‘नटी’ म्हणून केला. मात्र, अब्दुल सत्तार, गुलाब पाटलांसारख्या ‘नट’ मंडळींच्या झोकांड्या जाताना पाहून महाराष्ट्राची सुसंस्कृत रसिक जनता जोडेफेक करू लागली. तिकडे रवींद्र चव्हाण हे मिंधे मंत्रिमंडळातील एक मंत्री भायखळा पोलीस स्टेशनात जाऊन एका बलात्कारी गुन्हेगारास वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा राजीनामाच घ्यायला हवा. हे कसले महानाट्य? हा तर महाराष्ट्राच्या माथी दिल्लीने मारलेला महादळभद्री प्रयोग आहे.


