मोठा तोडगा; बच्चू कडू व रवी राणांचा वाद ‘वर्षा’वार

मोठा तोडगा; बच्चू कडू व रवी राणांचा वाद ‘वर्षा’वार
प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज, रविवारी (30 ऑक्टोबर) आमदार रवी राणा व बच्चू कडू या दोघांची ‘वर्षा’ या आपल्या शासकीय निवासस्थानी भेट घेणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडू आणि राणांमध्ये पेटलेल्या राजकीय वादावर आज तोडगा निघणार का?, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

-मुंबईत दोघांची भेट घेणार
मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी आमदार रवी राणा मुंबईसाठी अमरावतीहून रवाना झाले. तत्पूर्वी, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रवी राणा म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहे. नेत्यांनी बोलावल्यानंतर जावे लागते. म्हणूनच आज मी मुंबईत दोघांची भेट घेणार आहे. नेते मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे वागणे, हे आमचे कर्तव्य आहे.

-राणांच्या आरोपांवर तीव्र नाराजी

शिंदे गटासोबत येण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यावर स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. माझ्यासोबत कोणताही आमदार पैशासाठी आला नाही. तर, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारासाठी आमदार माझ्यासोबत आले, असे शिंदे म्हणाले. तर, शिंदे गटाची बुलंद तोफ गुलाबराव पाटील यांनीही रवी राणांच्या आरोपांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, एका जिल्ह्याच्या वादामुळे राज्याच्या 40 आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असा अर्थ होतो. त्यामुळे रणी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आता रवी राणांना आवरावे, अशी विनंतीही गुलाबराव पाटलांनी केली होती.

-काय आहे नेमका वाद ?

गेल्या काही महिन्यांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात वाद पेटला आहे. बच्चू कडू यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. यानंतर बच्चू कडू यांनी ‘येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्या, अन्यथा परिणामांची तयारी ठेवा’ असे आव्हान दिले आहे.

-मी शांत बसणार नाही
रवी राणांनी केलेल्या आरोपांवर मी शांत बसणार नाही असा इशाराच बच्चू कडूंनी दिला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना बच्चू कडू यांनी आपल्याला गुवाहाटीहून परत यायचे होते, असा खुलासा केला आहे. बच्चू कडू म्हणाले, आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. मी गुवाहीटाला जाऊ नये असे अनेकांना वाटत होते. अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे मला फोन आले. त्यामुळे गुवाहाटीला भेटून परत यायचे असे माझे ठरले होते. मी सोबत आहे इतके सांगून मला परत यायचे होते. मला तिथे थांबायचे नव्हते. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. ते करावे लागते, त्यात काही चुकीचे नाही. आम्हीदेखील नगरसेवकांना थांबवूनच ठेवतो.