पुन्हा तापले अमरावतीचे राजकारण : गरम केलेले खिसे थंड करा
-स्वाभिमान विरुद्ध भाजप वाद समोर
प्रतिनिधी
अमरावती : येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहीहंडी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रवी राणा यांनी भाजपमधील राणा विरोधी गटावर टीका केली आहे. ‘मी गेल्या २० वर्षांपासून गरिबांना किराणा वाटप करतो, ते तुम्हीही करा, गरम झालेले खिसे थंड करा’, अशा शब्दात भाजपच्या नेत्यांना त्यांनी टोला लगावला आहे. या वक्तव्यामुळे युवा स्वाभिमान विरुद्ध भाजप असा राजकीय वाद पुन्हा उफाळून आला आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेनंतर भाजपने दहीहंडीचे आयोजन यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे यांनी दहीहंडीसाठी होणारा खर्च टाळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बाळांच्या कुटुंबीयांना आणि जखमी बाळांच्या पालकांना देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पक्ष काय निर्णय घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करणार
युवा स्वाभिमान पक्षाने यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करावा, अशी विनंती करणारे पत्र भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या अध्यक्षांना पाठवले होते, त्यानंतर पक्षाची एक बैठक दोन दिवसांपुर्वी पार पडली. यात उत्सव साजरा करावा की नको, यावर चर्चा झाली. अखेरीस हा उत्सव अत्यंत साधेपणाने कोणताही गाजावाजा न करता केवळ बाळगोपाळांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल, अशी माहिती रवी राणा यांनी आज दिली.
रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेत्यांच्या कार्यशैलीवर तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, गेल्या २० वर्षांपासून आम्ही सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. मी ५० लाख रुपयांची मदत केली, तर तुम्ही १ कोटींची मदत वाटा, आम्हीही ती वाटण्यासाठी तुमच्या सोबत येऊ. केवळ दिखाऊ स्पर्धा न करता ही स्पर्धा दीर्घ काळासाठी करा. सध्या ज्यांचे खिसे गरम झाले आहेत, त्यांनी ते थोडे थंड करावेत, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. चांगल्या मनाने आणि सामाजिक भावना जपून भाजपने दहीहंडीचे आयोजन केले असते, तर अमरावतीत अशी अप्रिय दुर्घटना घडली नसती, असेही राणा म्हणाले.


