अमरावतीतील राजकीय वातावरण तापले : १२१ कोटी अन रवी राणा
-जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या घटनेवरून आरोप-प्रत्यारोप
प्रतिनिधी
अमरावती : युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून उभारण्यात येत असलेल्या मालखेड मार्गावरील हनुमान गढी या तीर्थस्थळासाठी १२१ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून राणा दाम्पत्यावर टीकेची झोड उठवली. दुसरीकडे, भाजपमधील राणा विरोधी गटाने हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या उपकरणांसाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मिळत नाही आणि हनुमान गढीसाठी तिजोरी खाली केली जाते, असा आरोप सुषमा अंधारे यांनी अमरावतीत पत्रकारांशी बोलताना केला. त्यावर प्रत्युत्तर देताना भाजपचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी भाजपचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी सुषमा अंधारे यांनी हनुमान गढीवर जाऊन हा प्रश्न विचारून दाखवावा असे आव्हानही दिले. दुसरीकडे, भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनीही या प्रकरणात काही चुकीचे असेल तर त्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्चितपणे घेतील, असा दावा केला.
अमरावती शहरालगत मालखेड मार्गावर ‘हनुमान गढी’ परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येत आहे. या परिसरात पर्यटन विकासासाठी १२१ कोटी रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. आमदार रवी राणा यांच्या पुढाकारातून या ठिकाणी १११ फूट उंचा हनुमानजींची मुर्ती उभारण्यात आली आहे. सर्वप्रथम माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांची भागिदारी तर नाही ना, अशी शंका उपस्थित करीत यशोमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील इतर देवस्थानांसाठी निधी का दिला जात नाही, असा प्रश्न विचारला होता.
–काय आहे सुषमा अंधारे यांचे आरोप?
येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार नितीन देशमुख, आमदार गजानन लवटे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर सरकारवर गंभीर आरोप केले होते. जिल्हा स्त्री रुग्णालयासाठी साडेनऊ कोटी रुपयांचा निधी आवश्यक असताना तो मिळत नाही आणि राणांच्या हनुमान गढीला सहजपणे १२१ कोटी रुपये दिले जातात, असा आरोप त्यांनी केला होता.
आरोपांवरून राजकीय धुरळा सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांवर थेट भाष्य करणे राणा दाम्पत्याने टाळले असले, तरी जिल्हा स्त्री रुग्णालय हे राजकीय संघर्षाचे स्थळ बनू नये, अशी अपेक्षा आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली. दुसरीकडे खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण पोटे यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. साडेनऊ कोटी रुपयांचा निधी हा जिल्ह्यातील रुग्णालयांच्या उपकरणांच्या खरेदीसाठी आहे आणि तो मंजूरीच्या प्रक्रियेत आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सुषमा अंधारे यांचे आरोप खोडून काढले. पण, त्याचवेळी १२१ कोटी रुपयांच्या निधीवरून राणांना जाब विचारावा, भाजपला नाही, असेही अंधारे यांना सुनावले. गटा-तटाच्या राजकारणातील हा एक वेगळा कोण ठरला आहे.


