अभिजित दीपकेला भेटायला राजकीय पक्षाची का आहे चढाओढ?
-दोन्ही शिवसेना अग्रस्थानी
प्रतिनिधी
छ. संभाजीनगर : ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनाला यश आल्यापासून राजकीय नेत्यांकडून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. दोन्ही सेनेच्या नेत्यांनी दिपकेंशी संपर्क साधला आहे, असे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले.
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा देणाऱ्या ठाकरे सेनेने त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. मात्र, आता शिंदेंसेनेनेही दिपके यांच्याशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या आठवडाभरात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि विधान परिषदेचे सदस्य बच्चू कडू यांनी स्वतंत्रपणे छत्रपती संभाजीनगर येथील दिपके यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी दिपके यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला आणि आंदोलनाचे जाहीरपणे कौतुकही केले.
शुक्रवारी अभिजीत दिपके यांच्याशी संपर्क साधण्याच्या हालचालींना आणखी वेग आला. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला, तर पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
अभिजीत दिपके यांच्याशी संपर्क साधताना ठाकरे गट आणि शिंदे गटाने वेगवेगळा मार्ग स्वीकारल्याचे दिसून येत आहे. सीजेपीचे आंदोलन सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) अभिजीत दिपके यांना उघडपणे पाठिंबा दिला होता. महाराष्ट्रासह दिल्लीत झालेल्या आंदोलनात ठाकरेसेनेचे नेते सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदेंसेनेने मात्र केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरच दिपके यांच्याशी संपर्क वाढवण्यास सुरुवात केली. अभिजीत दिपकेंशी जवळीक साधण्यासाठी दोन्ही सेनेमध्ये चढाओढ रंगल्याचे यातून दिसते.
सुरुवातीपासूनच उद्धव ठाकरेंचा पाठिंबा
अभिजीत दिपके यांनी ६ जूनपासून दिल्लीतील जंतरमंतर वर ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) आंदोलन पुकारले. नीट (NEET) पेपरफुटी आणि शिक्षणातील गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारला. व्यवस्थेतील या त्रुटींची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. सीजेपीचे हे आंदोलन पुढे देशभरातील तरुणांचा आवाज बनले आणि जवळपास दोन महिने सुरू राहिले.
आंदोलन जोर धरत असतानाच, १३ जुलैला उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. उद्धव ठाकरे दिपके यांच्या आंदोलनाच्या बाजूने उभे राहणारे महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले.
यावेळी उद्धव ठाकरे नमूद केले होते की, ‘हा राजकारणाचा विषय नसून देशातील तरुणांच्या भवितव्याचा लढा आहे.’ त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. तसेच महाराष्ट्रभर आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने करण्याची घोषणाही केली.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनासाठी अभिजीत दिपके यांनी त्यांचे आभार मानले होते. मात्र, आंदोलनातील सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. यानंतर दिल्लीतील चलो संसद मोर्चादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी हिंसक कारवाई केली. त्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः जंतर-मंतरवर पोहोचले आणि अभिजीत दिपके तसेच आंदोलकांची भेट घेतली. “महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास त्यांनी आंदोलकांना दिला.
दरम्यान, महाराष्ट्रात ठाकरेसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) एकत्र येत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तिरंगा मोर्चा काढला. तर, आदित्य ठाकरे यांनीही जाहीर सभा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून हा मुद्दा सातत्याने लावून धरला.
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शिंदे गटाची दिपकेंना साथ
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही अभिजीत दिपके यांच्याशी जवळीस साधण्यास सुरुवात केली आहे. पण सीजेपीच्या आंदोलनाचे मुख्य उद्देश पूर्ण झाल्यानंतर, शिंदेसेनेने त्यांच्याशी संपर्क साधला.
२५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिली, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील अभिजीत दिपके यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्यासह आई-वडिलांची विचारपूस केली. ‘क्रांतीची ठिणगी पेटवणारा तरुण’ म्हणत अभिजीत यांचे कौतुक केले. तसेच दिपकेंना सुरक्षा देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.
शिरसाट यांनी दिपके यांच्याशी असलेले वैयक्तिक नातेही अधोरेखित केले. दिपके हे आपल्या मतदारसंघातील असून मी त्याला लहानपणापासून ओळखतो, असे त्यांनी सांगितले. ‘माझ्या मतदारसंघातील एका तरुणाने इतके मोठे यश मिळवले, तर त्याच्या कुटुंबाची भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे,’ असे शिरसाट यांनी नमूद केले.
आंदोलन सुरू असताना दिपकेंची भेट का घेतली नाही, याबाबत विचारणा केली असता शिरसाट म्हणाले, ‘त्याला आधीच भेटण्याची इच्छा होती. पण आंदोलन सुरू असताना भेटलो असतो, तर अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले असते. आता आंदोलन संपल्यानंतर कुटुंबीयांची भेट घेतली.’


