सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरून शरद पवार स्पष्टचं बोलले, तो त्यांचा…?

सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदावरून शरद पवार स्पष्टचं बोलले, तो त्यांचा…?

-आज सायंकाळी होणार शपथविधी

प्रतिनिधी
नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार अशा चर्चा सुरू असतानाच आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईत दाखल झाल्या आहेत. आज सायंकाळी ५ वाजता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडींवर शरद पवार यांनी बारामतीत आज पत्रकारांशी संवाद साधत यावर भाष्य केलं आहे. तसेच सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवर देखील शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया देत हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचं सांगत सुनेत्रा पवारांशी आपली कोणतीही चर्चा झाली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

-शरद पवार म्हणतात…
सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्याबरोबर माझी त्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या चर्चा मी ऐकतोय, त्या मुंबईत सुरू आहेत, मी येथे (बारामतीत) आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत, तो त्यांचा अधिकार आहे. आता प्राधान्याने काय करावं? हे त्यांनी ठरवलेलं दिसत आहे. त्यांच्या आधी-मधी मी भाष्य करणार नाही”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.