४ डिसेंबरला भाजपाचा गटनेता, तोच असेल मुख्यमंत्री

४ डिसेंबरला भाजपाचा गटनेता, तोच असेल मुख्यमंत्री

-मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार

प्रतिनिधी
मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, सत्ता स्थापनेसाठी शपथविधीचा सोहळाही ठरला. शपथविधीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाणही ठरलं. पण या दिवशी कोण कोणत्या पदाची शपथ घेणार? मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण बसणार? याबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांनी सर्व बैठका रद्द केल्या आहेत. तर दुसरीकडे अजित पवार चर्चेकरता दिल्लीत गेले आहेत. दरम्यान, ४ डिसेंबरला भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत भाजपाचा विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. पीटीआयच्या हवाल्याने टाईम्स नाऊने हे वृत्त दिलं आहे.

राज्यात पुढचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आलंय. मात्र, महायुतीतील अंतर्गत वादामुळे हे नाव जाहीर करण्यास उशीर केला जातोय. सत्तास्थापनेत माझा कोणताही अडसर नसेल अशी भूमिका मांडलेल्या एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन-तीन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाची चर्चा रखडली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपद निश्चित करण्याकरता भाजपाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपाने निरिक्षकांची नावे जाहीर केली आहेत.

भाजपाने सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची महाराष्ट्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. या बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाणार आहे. विधीमंडळ नेता म्हणजे जो सरकारचे नेतृत्व करणार म्हणजेच मुख्यमंत्र्याची निवड केली जाणार आहे. रुपाणी आणि सीतारामण बुधवारी मुंबईत भाजपाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत. या बैठकीनंतर मुख्यमंत्रीपदासाठी निवडलेल्या उमेदवाराचे नाव दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना कळवले जाईल. त्यानंतर या निरीक्षकाकडून मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची घोषणा केली जाईल, असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.