हे तर दुर्दैव: महाराष्ट्रात लायकी, जुगाड करून मुख्यमंत्री
-संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेना टोला
प्रतिनिधी
मुंबई : अनेक जण लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री होतात, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी अजित पवारांचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार आणि संजय राऊत यांच्यात रंगलेला कलगीतुरा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. मात्र, अजित पवार खूप गोड माणूस आहेत. ते एक स्वीट डिश आहेत, असे म्हणत कालच संजय राऊत यांनी आपल्यात वाद नसल्याचे सांगितले होते. त्याचाच प्रत्यय आजही आला.
– रविवारी जळगावात उद्धव ठाकरेंची तोफ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर आज जळगाव येथे पत्रकार परिषदेत भाष्य करताना संजय राऊतांनी शिंदे गटावरच टीकास्त्र सोडले. जळगाव येथे उद्या रविवारी (23 एप्रिल ) उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. सभेच्या तयारीसाठी संजय राऊत कालच जळगावात दाखल झाले.
पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याच्या महत्त्वकांक्षेबाबत संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री बनायला कुणाला आवडणार नाही. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदावर बसण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावावर आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद सांभाळण्याची क्षमता अजित पवारांकडे आहे. ते कित्येक वर्षांपासून राजकारणात आहेत. अनेकवेळा मंत्री राहिलेले आहेत.
संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा काही प्रथमच व्यक्त केलेली नाही. यापूर्वीही अनेकदा ते आपल्या या इच्छेबाबत बोलले आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र, काही जण लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री झाले आहेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून गद्दारांनी सत्ता मिळवली आहे.
सातत्याने अजित पवार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याने महाविकास आघाडीत फूट पडली आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडी भक्कम आहे. अजित पवार यांनीही आपण राष्ट्रवादीतच राहणार असे स्पष्ट केले आहे. माझ्या मते अजित पवार यांची भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही. तर, ते राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ते पद मिळवतील. आता राज्यात महाविकास आघाडी विरोधात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यामध्ये कोणतीही चर्चा नाही. 2024 ला आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. तेव्हाच मुख्यमंत्रीपदाबाबत पाहू.


