हे घ्या ! आता काँग्रेस म्हणते, केरळमध्येही झाली मतचोरी
-भाजपा नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरून गदारोळ
प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करीत आहेत. कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता केरळमध्येही मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने भाजपा आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करीत आहेत. कर्नाटकमध्ये मतचोरीचा आरोप केल्यानंतर आता केरळमध्येही मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतचोरीचा मुद्दा उचलून धरणाऱ्या काँग्रेसला भाजपा नेत्याच्या एका वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा आरोप करण्याची संधी मिळाली आहे. आता काँग्रेसकडून केरळमधील भाजपाचे एकमात्र खासदार सुरेश गोपी यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गोपी हे केंद्रीय राज्यमंत्रीदेखील आहेत. मुख्य म्हणजे ते दक्षिणेकडील राज्यातून निवडून आलेले भाजपाचे पहिले खासदार आहेत.
भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान
भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. गोपाळकृष्णन यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितले, “ज्या जागांवर आमचा विजय होण्याची शक्यता आहे, तिथे आम्ही जम्मू आणि काश्मीरमधून लोकांना आणू, त्यांना एक वर्ष राहू देऊ आणि ते मतदान करतील याची खात्री करू. भविष्यातही आम्ही असेच करू. जर जम्मू आणि काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीला माझा विजय पाहायचा असेल. तर तो येथे येऊन माझ्यासाठी मतदान करण्याकरिता एक वर्ष राहिल्यास त्यात काय गैर आहे?” या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.


