हे काय बोलता ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी बसस्थानकच बंद

हे काय बोलता ? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी बसस्थानकच बंद

-पावसात प्रवाशांच्या अडचणीत वाढ

प्रतिनिधी
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या क्रांतिसूर्य महात्मा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळ्यासाठी शनिवारी दुपारपासून महामार्ग बसस्थानक बंद केल्यामुळे भर पावसात प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागले. या स्थानकातून सुटणाऱ्या बसेस ऐनवेळी ठक्कर बाजार व मेळा स्थानकातून सोडल्या गेल्याने प्रवाशांना दीड, दोन किलोमीटर अंतर धावपळ करावी लागली. कार्यक्रमास बराच विलंब झाल्यामुळे सायंकाळ उशिरापर्यंत परिस्थितीत बदल झाला नाही.

नाशिकमधील मुंबईनाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती कांस्य धातूच्या शिल्पाचा लोकार्पण सोहळा शनिवारी दुपारी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. हा अतिशय वर्दळीचा परिसर आहे. या कार्यक्रमासाठी महामार्ग बस स्थानकातील मोकळ्या जागेत भव्य जलरोधक तंबू उभारण्यात आले. याच स्थानकातून मुंबई, ठाणे, बोरिवली, कसारा, अहमदनगर, शिर्डी, सोलापूर, अक्कलकोट, बारामती आदी ठिकाणी बस सोडल्या जातात. उपरोक्त कार्यक्रमासाठी दुपारी एक वाजेपासून स्थानकातील बससेवा बंद करण्यात आली. येथील बसेस ठक्कर बाजार व मेळा स्थानकातून सोडण्याचे नियोजन करण्यात आले.