शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण करू नये

शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण करू नये
– माजी मंत्री केदारांचा कार्यकर्त्यांना सल्ला
प्रतिनिधी
नागपूर : लोकशाहीमध्ये मिळालेल्या संस्थांचा उपयोग जनतेच्या कल्याणाकरिता झाला पाहिजे. शासनाच्या योजना शेवटच्या नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील याची काळजी पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. राजकारणाच्या वेळी राजकारण व समाजकारणावेळी समाजकारण हा नियम सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पाळला पाहिजे. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खरेदी-विक्री संस्थांनी सदैव शेतकऱ्यांचे हित जपावे, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांनी केले.

खरेदी-विक्री सेवा संस्थेच्या वार्षिक आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानाचे जे पंचनामे झाले. त्यानुसार जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांसाठी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना मदतीचे वाटप होत असताना त्यात कुठल्याही प्रकारचा गोंधळ होता कामा नये. प्रत्येक शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळालाच पाहिजे. त्याची काळजी तालुकास्तरातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, खरेदी-विक्री समिती पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. तशा आशयाचे निर्देश सुद्धा पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिले. नैसर्गिक आपत्तीत मी सोबतच आहे. शेतकऱ्यांच्या शेतात कपाशी पिकाच्या काड्या झाल्यात. संत्राबागा पूर्णत: खराब झाल्यात. पुनर्जीवनाचे काम जलदगतीने शासनाकडून करून घेतल्या जाईल, असेही आश्वासन केदार यांनी दिले.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, पंचायत समिती सभापती श्रावणदादा भिंगारे, खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष बाबा कोढे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबाराव पाटील, तालुका काँग्रेस अध्यक्ष अशोक भागवत, माजी सभापती वैभव घोंगे, पं.स. उपसभापती जयश्री वाळके, जि.प. सदस्य देवानंद कोहळे, पिंकी कौरती, महेंद्र डोंगरे, पं.स.सदस्य प्रभाकर भोसले, विजय भांगे, मालतीबाई वसू, प्रतिभा पालटकर, नरेंद्र पालटकर, संस्था उपाध्यक्ष आशिष देशमुख, विठ्ठल हिवरे, ज्ञानेश्वर काळे, दामोदर ठाकरे, विजय गिरी, सुरेश डोंगरे, प्रभाकर रानडे, धर्माजी आसोले, सुरेश डफरे, संजय धोगडी, रवी शिरभाते, अजय मुंडवाईक, अण्णाजी चव्हाण, अरुण कोल्हे यांच्यासह सभासद शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमामध्ये सर्व शेतकऱ्यांना वार्षिक लाभांश देण्यात आला.