शरद पवारांना या नेत्याने तुरुंगात राहूनही ब्लॅकमेल : कोण ते ?

शरद पवारांना या नेत्याने तुरुंगात राहूनही ब्लॅकमेल : कोण ते ?

-माजी आमदार रमेश कदम यांचा दावा

प्रतिनिधी

पंढरपूर : तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विद्यमान मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्लॅकमेल करायचे, असा खळबळजनक दावा माजी आमदार रमेश कदम यांनी केला. ते माध्यमांशी संवाद साधत होते. कदम यांची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कदम जेलमध्ये होते.

शरद पवारांबद्दल नाराजी

रमेश कदम यांनी म्हटले, छगन भुजबळ शरद पवार यांना जेल मधून ब्लॅकमेल करायचे. जामिनासाठी भुजबळांची धडपड सुरू होती. आपला जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा देत भुजबळ त्यांना ब्लॅकमेल करत असत असा दावा कदम यांनी केला. भुजबळ जेव्हा तुरुंगात होते. तेव्हा त्यांच्यांशी माझी भेट होत असे. त्यावेळी भुजबळ हे पवार साहेबांनी मला मदत केली पाहिजे. जामिनाला खूपच उशीर होत आहे, असे म्हणतं नाराजी देखील बोलून दाखवायचे.

आताचे भुजबळ वेगळे

सत्तेतील आताचे छगन भुजबळ आणि तुरुंगामध्ये असतानाचे छगन भुजबळ याच्यात खूप फरक आहे. जेलमध्ये ते रोज आजारी पडायचे. काकूळतीला यायचे त्यांना रोज उपचाराची गरज होती. जेल मधून बाहेर आल्यापासून आम्ही बातमी ऐकली नाही छगन भुजबळ यांच्या छातीत दुखतंय, असेही कदम यांनी म्हणत भुजबळांना टोला लगावला. जेलमध्ये गेलं की लोक आजारी पडतात त्यांना माहीत आहे. सहानुभूती मिळवून कसा जामिन मिळवायचा हे देखील त्यांना माहित आहे. परंतु जेल ही कोणाच्या नशिबात येऊ नये नरक आहे, असेही कदम म्हणाले.

312 कोटींचा घोटाळा
माजी आमदार रमेश कदम यांच्यावर अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये 312 कोटी रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी त्यांना सर्व गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला. रमेश कदम यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. मोहोळ मध्ये परतल्यानंतर कदम यांचे त्यांच्या समर्थकांनी जंगी स्वागत केले. कदम यांनी तूर्तास कोणतीही राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही.