विषयच संपविला; मंत्री सत्तारांना क्लिन चिट

विषयच संपविला; मंत्री सत्तारांना क्लिन चिट

-फडणवीस यांचे नरमाईचे धोरण
प्रतिनिधी
नागपूर : गायरान घोटाळा, टीईटी घोटाळा व सिल्लोड महोत्सवासाठी १५ कोटींच्या वसुली प्रकरणात विरोधकांनी हल्लाबोलऐवजी नरमाईचे धोरण अवलंबल्याने कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली. विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात सत्तार यांनी निवेदन करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. आपण कुठलेही नियमबाह्य काम केले नसून कोर्ट देईल ती शिक्षा भोगण्यास तयार आहाेत, असे सांगत सत्तार यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळली. तसेच सिल्लोड महोत्सवाबाबत पत्रक काढून पैसे घेऊन प्रवेशिका खपवण्याचा प्रकार झाला असेल तर चौकशी करून कारवाई करू, असे सांगितले.

-टीईटी घोटाळा अध्यक्षांनी नाकारला

टीईटी घोटाळा प्रकरणात सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याप्रकरणी विचारणा करणारा अजित पवारांचा प्रश्न विधानसभा नियम ३५ अ आणि उपकलमांन्वये नाकारल्याचे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. त्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाला. यावर फडणवीसांनी विरोधकांना टार्गेट करत, ‘हा घोटाळा तुमच्याच काळात झाला होता. सत्तार यांच्या मुलींना बेकायदा प्रमाणपत्र देऊन नोकरी दिल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, शिक्षण उपसंचालकांनी ही यादी अपात्र ठरवली असून त्यात सत्तार यांचा काहीही संबंध नाही,’ असे सांगितले.

मंत्री सत्तार यांचे स्पष्टीकरण

टीईटी प्रकरणी फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. ही संधी साधत सत्तार यांनी गायरान जमीन घोटाळाप्रकरणी निवेदन केले. या वेळी विरोधी बाकावर कुणीही नव्हते. गायरान जमीन नियमानुसारच हस्तांतरित केली आहे. वारसा नोंदी व जमीन कसत असल्याचे पुरावे आल्यामुळे तथ्यांच्या आधारे मी हा निर्णय घेतला. माझ्या निर्णयामुळे कुणाचा फायदा अथवा नुकसान झाले नाही. जमिनीची सुनावणी महसूल राज्यमंत्री म्हणून माझ्याकडे सुरू असेपर्यंत योगेश खंदारे यांनी १९४७ ते १९५२ पर्यंतचा जमीन पेरणीचा पुरावा सादर केला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालय जो निर्णय देईल तो मला मान्य आहे, असे विस्तृत निवेदन त्यांनी केले.