वाचा नेमके प्रकरण ! या राज्यात ब्राह्मण आमदारांच्या बैठकीने भाजपा अडचणीत

वाचा नेमके प्रकरण ! या राज्यात ब्राह्मण आमदारांच्या बैठकीने भाजपा अडचणीत

-पक्षांतर्गत अस्वथतता मोठ्या संकटात बदलू नये म्हणून काळजी

प्रतिनिधी
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ब्राह्मण आमदारांच्या एका बैठकीने भारतीय जनता पक्षाला (भाजपा) अडचणीत आणले आहे. जातीपातीच्या राजकारणावरून निर्माण झालेली ही अस्वस्थता पक्षांतर्गत मोठ्या संकटात बदलू नये यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला ‘डॅमेज कंट्रोल’ करावे लागत आहे. लखनौमध्ये २३ डिसेंबर रोजी झालेल्या ब्राह्मण आमदारांच्या या बैठकीमुळे जातीआधारित संघटन, शिस्त आणि प्रतिनिधित्व या विषयांवरील पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

हा वाद वाढत असल्याने भाजपाने माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ ब्राह्मण नेते रमापती राम त्रिपाठी यांच्यावर नाराज आमदारांची समजूत काढण्याची आणि पक्षांतर्गत संतुलन राखण्याची जबाबदारी सोपवली आहे. नेमकी परिस्थिती काय? भाजपाच्या अडचणी का वाढल्या? पक्षांतर्गत फूट पडणार का? याबाबत ‘न्यूज १८’ने वृत्त दिले आहे.

देवरियाचे माजी खासदार व पूर्वांचलमधील भाजपाचा प्रमुख चेहरा रमापती राम त्रिपाठी यांनी मंगळवारी देवरियाचे आमदार शलभ मणी त्रिपाठी यांची भेट घेतली. त्यांनी अनेक ब्राह्मण आमदारांशी फोनवरही चर्चा केली असून, त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पक्षनेतृत्व त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार असल्याचे आश्वासनही दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्रिपाठी यांनी आमदारांना आपल्या समस्या थेट संघटनात्मक नेतृत्वाकडे मांडण्याचा सल्ला दिला आहे.

याच दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात ही भेट ब्राह्मण आमदारांच्या बैठकीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीशी जोडली जात आहे. चौधरी यांनी यापूर्वीच आमदारांना कडक इशारा दिला होता की, भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही बैठकीकडे ‘शिस्तभंग’ म्हणून पाहिले जाईल आणि त्यावर कारवाई केली जाईल.

कुशीनगरचे भाजपा आमदार पी. एन. पाठक (पंचानंद पाठक) यांच्या लखनौ येथील निवासस्थानी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अधिकृतपणे हा कार्यक्रम त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केल्याचे सांगण्यात आले होते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान झालेल्या या बैठकीला पूर्व उत्तर प्रदेश आणि बुंदेलखंडमधील सुमारे ४५ ते ५० ब्राह्मण आमदार उपस्थित होते, ज्यात काही इतर पक्षांच्या आमदारांचाही समावेश होता. हा राजकीय मेळावा नसून, केवळ एक सामाजिक कार्यक्रम असल्याचा दावा करण्यात आला.

मात्र, विधानसभा अधिवेशन सुरू असताना एवढ्या मोठ्या संख्येने एका विशिष्ट जातीच्या आमदारांनी एकत्र येण्यामुळे भाजपाची चिंता वाढली. सूत्रांनुसार, वरिष्ठ स्तरावर याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडून यात हस्तक्षेप करण्यात आला. मुख्यमंत्र्यांचे ओएसडी सरवण बघेल यांनी पाठक यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले, ज्यावर पाठक यांनी असा कोणताही राजकीय ठराव तिथे संमत झाला नसल्याचे सांगितले.

हे प्रकरण उघड बंडापर्यंत पोहोचू नये म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी पडद्यामागून हालचाली केल्याचे समजते. या चर्चेची माहिती असलेल्या सूत्रांच्या मते, ही बैठक ब्राह्मण आमदारांमधील खोलवर असलेली अस्वस्थता दर्शवते. भाजपाच्या कार्यप्रणालीत जातीआधारित मोर्चेबांधणीमुळे इतर गट प्रबळ झाले असताना, ब्राह्मणांची ताकद हळूहळू कमी होत असल्याची भावना या आमदारांमध्ये आहे. उपमुख्यमंत्री या समाजाचा असूनही खरी सत्ता आणि प्रभाव दुसरीकडेच वळला आहे, असे त्यांना वाटते.

लखनौच्या डॉ. भीमराव आंबेडकर विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व राजकीय विश्लेषक शशिकांत पांडे यांच्या मते, या अस्वस्थतेकडे केवळ एक घटना म्हणून पाहता येणार नाही. “ब्राह्मण संख्येने प्रबळ नसले तरी ऐतिहासिकदृष्ट्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात ते ‘अजेंडा सेटर्स’ राहिले आहेत. ज्या पक्षाला त्यांनी भरभरून पाठिंबा दिला, त्याच पक्षात आपला आवाज कमकुवत होत असल्याचे जेव्हा या गटाला वाटते, तेव्हा नेतृत्वाला त्याची दखल घ्यावीच लागते. हे बंडापेक्षा स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी केलेली फेरमांडणी आहे,” असे पांडे म्हणाले.