राहुल गांधीचा हायड्रोजेन बॉम्ब फुटला ! निवडणूक आयोगावर हे आरोप
-राज्याबाहेरचे मोबाइल ओटीपी साठी वापरले गेल्याचा आरोप
प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोग व देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आज लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केले. २०२३ मध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीत वोट चोरी झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला असून त्यासंदर्भातील काही पुरावेदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. मतदार यादीतून काही व्यक्तींची नावे वगळण्यासाठी त्यांच्या ओळखीचा वापर भलत्याच व्यक्तींनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासाठी राज्याबाहेरचे मोबाईल क्रमांक ओटीपीसाठी वापरले गेल्याचे ही ते म्हणाले. जवळपास पाऊण तास चाललेल्या सादरीकरणानंतर राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली.
यावेळी पुरावे सादर करताना राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली. “देशात चालू असलेली मतचोरी कोण करतंय हे निवडणूक आयुक्तांना माहिती आहे. पण ते या सगळ्या घोटाळेबाजांना पाठिशी घालत आहेत, त्यांचा बचाव करत आहेत”, असा आरोप राहुल गांधींनी केला.
“कर्नाटकमध्ये फेब्रुवारी २०२३ मध्ये गुन्हा दाखल झाला. राज्य सीआयडीने निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील माहिती मार्च २०२३ मध्ये मागितली. ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने उत्तर दिले, पण त्यात माहिती दिलेली नव्हती. जानेवारी २०२४ मध्ये सीआयडीने पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून पूर्ण माहितीची मागणी केली. पण त्यावर उत्तर आले नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये सीआयडीने निवडणूक आयोगाला शेवटचं पत्र लिहिलं. हे सगळं होत असताना कर्नाटक निवडणूक आयोगानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि या माहितीची मागणी केली. अनेकदा ही मागणी केली गेली. पण त्यावर काहीही उत्तर देण्यात आलं नाही. त्यामुळे हा स्पष्ट पुरावा आहे की जे लोक हे करत आहेत, त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार वाचवत आहेत”, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला.


