राहुल गांधींचा तरुणांना शब्द : १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख नोकऱ्या
-निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या हातातून निसटत असल्याचे मत
प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध सभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या टीकेला काँग्रेस नेते राहुल गांधी प्रत्युत्तर देत आहेत. निवडणुकीचे वातावरण तापलेले असतानाच राहुल गांधी यांनी मोठा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होतील, तेव्हा इंडिया आघाडीला बहुमत मिळेल. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातून निसटत आहे”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.
-राहुल गांधी म्हणाले
“देशातील तरुणांनो! ४ जून रोजी देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. आम्ही तुम्हाला गॅरंटी देत आहोत की, १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख रिक्त सरकारी पदांवर भरतीचे काम सुरू करू”, असं आश्वासन राहुल गांधींनी देशातील युवकांना दिलं. याचवेळी राहुल गांधी यांनी देशातील युवकांना एक सल्लाही दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खोट्या प्रचाराने विचलित होऊ नका, आपल्या मुद्द्यांवर ठाम राहा. इंडिया आघाडीचे ऐका, द्वेष करू नका आणि नोकरी निवडा”. असे राहुल गांधी म्हणाले आहेत. यासंदर्भात राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भारतीय जनात पार्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
–म्हणाले, मोदी खोटे बोलताहेत
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं की, दोन कोटी तरुणांना रोजगार देण्यात येईल. मात्र, ते खोटं बोलले होते. त्यांनी नोटबंदी केली. जीएसटी चुकीच्या पद्धतीने लावला. मोदी सरकार उद्योगपती अदानी यांच्यासारख्या लोकांसाठी काम करत आहे. मात्र,आम्ही भरती भरोसा स्किम आणत आहोत. देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि १५ ऑगस्टपर्यंत ३० लाख तरुणांना रोजगार देण्याचं काम सुरु होईल”, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


