राष्ट्रवादी अजितदादा गटाचा मोठा दावा : माझ्या विजयात काँग्रेसचे भरघोस योगदान

राष्ट्रवादी अजितदादा गटाचा मोठा दावा : माझ्या विजयात काँग्रेसचे भरघोस योगदान

-महाविकास आघाडीत चिंतेचे कारण

प्रतिनिधी
रायगड : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रायगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. तटकरे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. सुनील तटकरे यांना ५ लाख ८ हजार ३५२ मतं मिळाली. तर अनंत गीते यांना ४ लाख २५ हजार ६६८ मतं मिळाली. अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन या चार विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळालं. तर दापोली आणि गुहागर या रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघात अनंत गीते आघाडीवर राहीले. अलिबाग आणि पेण या दोन मतदारसंघात मिळालेल्या लक्षणीय मताधिक्यामुळे तटकरे यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. दरम्यान, अलिबागमध्ये आम्हाला काँग्रेसचंही सहकार्य मिळालं असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.

सुनील तटकरे म्हणाले, निवडणुकीच्या काळात सांगितलं जात होतं की, अलिबाग विधानसभा मतदारसंघात मी २ ते ५ हजार मतांनी पिछाडीवर राहीन. काही लोकांनी या परिसरात अपप्रचार केला, माझ्याविरोधात वातावरणनिर्मिती केली. परंतु, आमदार महेंद्र दळवी, भाजपा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी मेहनत घेतली. तसेच काँग्रेसच्या काही सहकाऱ्यांनी आम्हाला मदत केली. या सर्वांच्या बळावर मला २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यंदा जास्त मतं मिळाली. अलिबाग मतदारसंघातही याआधीच्या निवडणुकीपेक्षा मला अधिक मतं मिळाली. यदाच्या निवडणुकीत मला फार चांगलं यश मिळालं.

दरम्यान, तटकरेंच्या दाव्याने महाविकास आघाडीच्या चिंता वाढल्या आहेत. कारण या निवडणुकीत काँग्रेसने मविआच्या उमेदवाराऐवजी महायुतीच्या उमेदवाराला मदत केली असेल तर त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होऊ शकतो.

या मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. यात १० लाख ९ हजार ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी ५०.१७ टक्के मतं सुनील तटकरे यांना मिळाली. तर अनंत गीते यांच्या पारड्यात ४३ टक्के मतं पडली.