राष्ट्रवादीचे राजकारणात नवे संकेत : नेमके काय आहे प्रकरण ?
-चिंतन शिबिरासाठी का केली नागपूरची निवड
प्रतिनिधी
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नागपूरमध्ये चिंतन शिबीर आटोपून सात दिवस उलटले तरी त्याचे कवित्व अद्याप संपले नाही, चिंतनासाठी राष्ट्रवादीने संघभूमी नागपूरची निवड केल्याने पक्ष संघ-भाजपच्या जवळ जातो आहे काय अशी शंका व्यक्त केली जात होती ती शिबिरात पारित झालेल्या ‘नागपूर डिक्लेरेशन’मुळे खरी ठरली आहे. यात राष्ट्रवादीने भाजपसोबत युती अधिक बळकट करण्याची भूमिका उघडपणे घेतली आहे. या ठरावाने महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणात नवे संकेत दिले आहेत.
दिल्लीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यक्रमात पक्षाच्या राज्यसभा सदस्य सुनेत्रा पवार यांनी घेतलेला सहभाग , त्यानंतर चिंतन शिबीरासाठी नागपूरची निवड करणे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या जवळ चालली अशी चर्चा सुरू झाली होती, शिबिरात राजकीय चिंतन करताना पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी मात्र पक्षाची विचारधारा ही फुले-शाहू-आंबेडकर यांचीच असल्याचे स्पष्ट केले.
पण ते करताना त्यांनी पक्षाच्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध विचारधारा असलेल्या भाजपच्या जवळीकीची गरजही व्यक्त केली. मुळ पक्षापासून फारकत का घेतली याची कारणे कार्यकर्त्यांना सांगतांना त्यांनी राज्याच्या विकासासाठी आपण ही भूमिका घेतली असे, सांगितले. पण त्यातून त्यांचा सत्तेचाच मोह दिसून आला. आता सत्तेत राहायचे म्हणजे भाजपशी जुळवून घेणे आलेच. त्याचेच प्रतिबिंब म्हणजे ‘नागपूर डिक्लेरेशन’ हा ठराव होय.


