राष्ट्रवादीचा हे आमदार म्हणतात; शिंदे- फडणवीस सरकार लवकर जाणार
-म्हणाले, आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या
प्रतिनिधी
मुंबई : आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, या सरकारचे काउंटडाउन सुरू झाले आहे. लवकरच हे सरकार सत्तेत दिसणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच हे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडी राज्याला एक स्थिर सरकार देईल असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.
यावेळी ते म्हणाले, राज्यात 2 दिवसांचा यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम दौऱ्यावर होते. मात्र त्यांनी पारस दुर्घटनेतील 9 लोकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांची साधी चौकशी देखील केली नाही.
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, कृषीमंत्री अब्दुल सत्तार बांधावर येऊन गेले. मात्र अजून शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. रामराज्याची वल्गना करणारे हे सरकार असले तरी अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. तर या राम राज्यात शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करत अमोल मिटकरी यांनी या सरकारचे काऊंटडाऊन आता सुरु झाले आहे, असा दावा केला आहे.
अमोल मिटकरी पुढे म्हणाले, काल संजय राऊत जे म्हमाले त्यांच्या त्या मताशी मी सहमत आहे. सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण त्यांचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही.
अमोल मिटकरी यांनी शिवसेना-भाजप सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रस फुटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे आपल्या काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनीही काल भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव असल्याचे सांगत टीका केली आहे.
मात्र अमोल मिटकरी यांनी अजितदादांच्या भाजप प्रवेशावरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मिटकरी म्हणाले, अजित पवार हे विरोधीपक्ष नेते आहेत. आणि त्यांना त्यांची जबाबदारी चांगल्याप्रकारे माहित आहे. त्यांची उगीचच बदनामी केली जात आहे.


