राज्याचे राजकारण का फिरतेय कामठी शहराभोवती? बावनकुळे विरोधात…!
-कुंभारे म्हणतात, आपण विधानावर ठाम
प्रतिनिधी
नागपूर : तसं पाहिले तर कामठी हे विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील छोटसं शहर, तेथील पालिकेचा जीवही तेवढाच, तेथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीचा संबंध थेट पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यातील वादग्रस्त जमीन खरेदीशी जोडला गेला आहे, यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांच्या मित्रपक्षाने (आता नाही) गंभीर आरोप केले. पुण्याचे राजकीय महत्व आणि बावनकुळेंचे मंत्री असणे या दोन कारणांमुळे प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू झाली. बावनकुळे यांनी सर्व आरोप फेटाळत आरोपकर्त्यांना मानहानीची नोटीस बजावली .
२ डिसेंबरला राज्यात नगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात नागपूर जिल्ह्यातील कामठी नगर पालिकेचाही समावेश होता. ती राजकीयदृष्ट्या चर्चेत होती, कारण कामठी हे भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येथील निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची. माजी मंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे यांची कर्मभूमीही कामठीच. त्या पालिकेच्या माजी नगराध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीही ही निवडणूक तेवढीच महत्वाची.
कुंभारे यांचा बहुजन-रिपब्लिन एकता मंच हा मागील १५ वर्षापासून भाजपसोबत आहे. खुद्द कुंभारे या भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. पंधरा वर्षात झालेल्या सर्व निवडणुकीत कुंभारे यांचा भाजपला पाठिंबा होता. नागपूर महापालिकेतही हीच स्थिती होती. खुद्द चंद्रशेखर बावनकुळे आणि कुंभारे यांचे राजकारणात उत्तम ,स्नेहपूर्ण संबध राहात आले. कामठी पालिका निवडणुकीतही भाजप-बरिएम युती राहील, असा अंदाज होता, सुत्रांच्या माहितीनुसार बरिएमचे उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढण्यास तयार होते. पण भाजपचा निर्णय स्वबळावरचा होता. त्यामुळे युती झाली नाही. परिणामी दोन मित्रपक्ष परस्परांच्या विरोधात रिंगणात उतरले.
बरिएमच्या प्रमुख सुलेखा कुंभारे यांनी प्रचारा दरम्यान भाजपवर,, बावनकुळे यांच्यावर सत्तेचा गैरवापराचे आरोप केले, पण ते राजकीय स्वरुपाचे असल्याने भाजपकडून त्याला प्रतिउत्तर दिले गेले नाही. मात्र मतदानाच्या दिवशी ठिणगी पडली. भाजपचे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या फार्म हाऊसवर पोलिसांनी छापा मारला. तेथे बोगस मतदान करण्यासाठी आणलेली माणसे लपवून ठेवण्यात आली होती, मतदानानंतर लावण्यात येणारी बोटावरची शाई पुसून काढण्यासाठी रसायनाची बाटली आणि रोख रक्कम सापडली, असा आरोप व व्हीडीओ कुंभारे यांनी माध्यमांना दाखवले. त्यामुळे भाजप संतापली व बावनकुळे यांना बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचण्यात आले ,असे प्रतिउत्तर कुंभारे यांना देण्यात आले.
सुलेखा कुंभारे यांनी कामठी पालिका निवडणुकीचे कनेक्शन पुण्याच्या वादग्रस्त जमीन खरेदीशी जोडले. त्याला स्थानिक राजकारणाचा आणि उमेदवार पळवापळवीचा संदर्भ आहे. कामठी शहर हे दलित आणि मुस्लिमांची अधिक लोकसंख्या असलेले शहर आहे. त्यामुळे हे समाज ज्यांच्या मागे उभे राहतात, त्यांना निवडणुकीत यश मिळते, हे आजवर कामठी पालिका निवडणुकीत दिसून आले. त्यामुळेच भाजपला येथे २५ वर्षापासून नगराध्यक्षपद मिळवता आले नाही. याच कारणामुळे काँग्रेसचे येथे प्राबल्य आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांनी वरील दोन्ही समाजाच्या मतांची विभागणी कशी होईल यासाठी प्रयत्न केले. काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुक शहाजहा खान यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने ते नाराज झाले. त्यांनी राष्ट्रवादीत जाऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवली. काँग्रेेसने येथे शकुर नागाणी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे रिंगणात मुस्लिम समाजाचे दोन उमेदवार झाले.
कुंभारेंच्या मते शहाजहा खान यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांच्याकडे प्रयत्न केले. मुस्लिम मतांचे विभाजन व्हावे हा त्या मागचा हेतू होता. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे पुण्यातील जमीन खरेदी प्रकरण सध्या गाजत आहे, हे प्रकरण महसूल खात्याशी संबंधित आहे, या खात्याचे मंत्री बावनकुळे आहेत, कामठी हे बावनकुळे यांच्या मतदार संघातील शहर आहे, असे हे कामठीचे पुणे कनेक्शन आहे. यासंदर्भातील आरोपामुळे बावनकुळे संतापले आहेत, त्यांनी कुंभारे यांना मानहानीची नोटीस बजावून दिलगिरी व्यक्त करावी,अशी मागणी केली आहे, सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्यात हा मुद्या गाजण्याची शक्यता आहे.


