या बेताल मंत्र्यांना आवरा; शिंदे सरकारमधील मंत्र्याना झालंय काय?
-आक्षेपार्ह शब्दांत टीकेने सरकारची डोकेदुखी
प्रतिनिधी
मुंबई : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. मात्र, वादात सापडलेले सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील पहिले नेते नाही. त्यांच्या आधी आमदार प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर आणि संतोष बांगर हेही वादात सापडले होते. यापूर्वीही अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याच मंत्री आणि आमदारांमुळे अडचणीत आले आहेत.
-प्रकार सुर्वे
गोरेगाव येथील जाहीर सभेत आमदार प्रकार सुर्वे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केले होते. ठाकरे गटाला उद्देशून सुर्वे म्हणाले होते की, आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, कोणी गैरवर्तन केले तर त्यांना मारहाण करा, प्रकाश सुर्वेचा पूर्ण पाठिंबा आहे. तुम्ही त्यांचे हात तोडू शकत नसाल तर त्यांचे पाय तोडा. पोलिसांची काळजी करू नका, मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच जामीन करून देईन. आम्ही कोणाच्याही आड येणार नाही, पण आमच्या मार्गात कोणी अडथळा आणला तर गप्प बसणार नाही. आम्ही त्यांना आक्रमकपणे प्रत्युत्तर देऊ.
-सदा सरवणकर
सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांच्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रात्री हल्ला केला होता. या प्रकरणी दोन्ही गटातील नेते व कार्यकर्ते रात्रीच प्रभादेवी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. आमदार सदा सरवणकर यांनी त्याच रात्री स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने गोळीबार केला होता, असा आरोप शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी केला होता. या आरोपानंतर आमदार सदा सरवणकर यांचे परवाना असलेले रिव्हॉल्व्हर मुंबई पोलिसांनी जप्त केले आणि फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले.
-शीतल म्हात्रे
शिंदे गटाच्या प्रवक्त्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सप्टेंबर महिन्यात खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या फोटोत सुप्रिया सुळे एक खुर्चीवर बसलेल्या दिसत आहेत. मागे ‘महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री’ असे लिहिले दिसत आहे. या फोटोला मार्फ सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती नलावडे यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. शीतल म्हात्रे यांनी जाहीर माफी मागावी आणि सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो ट्विटरवरून काढा किंवा मागे घ्या, अशी मागणी नलावडे यांनी केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हात्रे यांनी कुठून फोटो घेऊन मॉर्फ केले आहे, याची माहितीही त्यांनी दिली होती.
-गुलाबराव पाटील
सुषमा अंधारेंवर टीका करताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचीही जीभ घसरली होती. गुलाबराव पाटील म्हणाले होते, सुषमा अंधारे यांचा पिक्चर कुठेच चालला नाही. संपूर्ण जळगाव जिल्हा मला ओळखतो आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. उद्धव ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. त्यामुळे त्यांनी सुषमा अंधारे यांना त्यांच्या पक्षात घेतले. ती ‘नटी’ आहे.
-संतोष बांगर
कलमपुरी विधानसभा (हिंगोली) मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर हे अनेकदा वादात सापडले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर केटरिंग सर्व्हिस मॅनेजरसोबत गैरवर्तन करणे आणि त्याला थप्पड मारल्याचा आरोप झाला होता. काही दिवसांपूर्वी आमदार बांगर आपल्या 27 समर्थकांसह मंत्रालयात पोहोचले होते. पोलिसांनी त्यांच्या समर्थकांना मंत्रालयात जाण्यापासून रोखले असता त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.


