या नेत्या म्हणतात, विधानसभेच्या 200 वर जागा जिंकू

या नेत्या म्हणतात, विधानसभेच्या 200 वर जागा जिंकू

-राठोड यांच्या राजीनाम्यावर ठाम

-चित्रा वाघ यांचे नागपुरात वक्तव्य

प्रतिनिधी
नागपूर : दोनशेंवर जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर खपवून घेणार नाही. संजय राठोड यांच्या विरोधात माझी लढाई मी लढत आहे. त्यांच्या राजीनाम्यावर मी ठाम आहे, अशी स्पष्टोक्ती भाजपा महिला आघाडी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज नागपुरात पत्रकार परिषदेत केली.

प्रत्येक जिल्ह्यात मला संजय राठोड यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. पण, माझी न्यायालयीन लढाई सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद कायदा हवा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद विरोधी कायद्यानुसार मुस्लिम व्यक्तीने हिंदू तरुणीशी विवाह करून तिचे धर्मांतर केल्यास पाच वर्षांचा कारावास आणि 15 हजार रुपये दंड आहे. तर मुलगी अनुसूचित जाती, जमातीची अथवा आदिवासी आणि अल्पवयीन असल्यास किमान 2 ते सात वर्षे कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची तरतुद आहे.जबरदस्तीने आंतरधर्मीय लग्न लावले जातात त्यांच्यासाठी लव्ह जिहाद कायदा राज्यात होणे आवश्यक असल्याचे वाघ यांनी सांगितले.

-अशा नराधमाला फाशीच

वसईतील श्रद्धा वालकर तरूणीची तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीन पुनावाला याच्याशी एका ऑनलाईन डेटिंग अ‌ॅपवरून ओळख झाली होती. यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. अशा नराधमाला फाशीच दिली पाहिजे, असे वाघ म्हणाल्या. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. प्रेम करणाऱ्या मुलीचा विश्वासघात केला आहे, असे त्या म्हणाल्या.

अडीच वर्षात अनेकदा आंदोलने

अडीच वर्षात आम्ही अनेकदा आंदोलने केली. माञ महाविकास आघाडी सरकारने आमचे त्यावेळी ऐकले नाही. आता आमचे सरकार आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही तत्काळ दखल घेत कारवाई करतात. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात काय केले हे कोणी सांगावे, असा सवाल वाघ यांनी केला.

अस्मितेवर घाला खपवून घेणार नाही

नंदुरबार येथील घटनेत देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना निलंबित केले. भंडारा येथील घटनेतही कारवाई केली. शिंदे, फडणवीस सरकारच्या काळात महिलांकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. प्रत्येक बुथवर येत्या काळात पंचवीस महिला कार्यकर्त्या पाहायला मिळतील. 200 प्लस जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या अस्मितेवर कोणी घाला घालत असेल तर खपवून घेणार नाही.