या नेत्याचे संकेत : राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप
-विश्वजीत कदम तडकाफडकी दिल्लीला रवाना
प्रतिनिधी
नागपूर :ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 17 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता. विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी, अशी विनंती विश्वजीत कदम यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. या जागेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेत ते आक्रमक झाले आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे. या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे. महाविकास आघाडीतून अनेक लोकं बाहेर पडतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“महाविकास आघाडीमध्ये कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही. सगळे एकमेकांच्या सीटवर उमेदवार घोषित करत आहेत, अशी परिस्थिती आहे. अनेक लोकं महाविकास आघाडीतून बाहेर पडलीत. वंचित आणि महाविकास आघाडीत काय झालं? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्या संदर्भात मला काहीही बोलायचं नाही, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.


