या नेत्याचा दावा: 16 आमदार अपात्र, तरीही सरकार कोसळणार नाही
-149 आमदारांची गरज, त्यांच्याकडे 165 आमदार
प्रतिनिधी
मुंबई : राज्यात मुख्यमंत्री बदलला जाणार अशी काही परिस्थिती नाही, पण सुप्रीम कोर्टाच्या निकालावर हे सर्व अवलंबून आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी त्यांना 149 आमदारांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या 165 आमदार आहे. त्यामुळे सरकार त्यांचेच राहील, मुख्यमंत्री बदलू शकतात. मात्र, सरकारला धोका नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरू आहेत, असा मोठा दावा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. काल जळगावात बोलतानाही संजय राऊत यांनी 15 दिवसांत सरकार कोसळण्याचा इशारा दिला होता. संजय राऊतांचा हा दावा छगन भुजबळांनी फेटाळून लावला.
छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना म्हणाले, 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. त्यांच्याविरुद्ध निकाल गेलाच तर शिंदे साहेब त्यात आहेत. ते मुख्यमंत्रीपदावरून गेले तर दुसरा मुख्यमंत्री येईल. पण या जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांच्याविरोधात निकाल जाईलच याची काय खात्री? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. जर समजा तसा निकाल आलाच तर मुख्यमंत्रीपद गेले तरी सरकारला 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 गेले तरी 149 आमदार शिल्लक राहतात. सरकार त्यांचेच राहील, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीविषयी भाजप नेतृत्व नाराज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याच्या हालचाली दिल्लीत नक्की सुरू आहे. याची माहिती मलाही आहे. कदाचित छगन भुजबळ यांना अधिक माहिती असेल. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून का हटवले जात आहे, याची कारणेही मला माहिती आहे. राज्याचे नेतृत्व करण्यात एकनाथ शिंदे अपयशी ठरले आहेत.


