मोठे भाकीत : हा नेता आता मुख्यमंत्री होणे नाही

मोठे भाकीत : हा नेता आता मुख्यमंत्री होणे नाही

-राजनीतिकार प्रशांत किशोर यांचे भाष्य

प्रतिनिधी
बिहार : निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज पक्षाच्या माध्यमातून राजकीय आखाड्यात उतरलेले प्रशांत किशोर हे एकेकाळी नितीश कुमार यांचे जवळचे सहकारी होते. जनता दल (संयुक्त) पक्षाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या राजकीय उड्यांसाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या दहा वर्षात भाजपा आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी त्यांनी दोन वेळा आघाडी करून वारंवार मुख्यमंत्रीपद मिळवलेले आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. पण या निवडणुकीनंतर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तविले आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, यंदाची निवडणूक नितीश कुमार भाजपाबरोबर लढवतील. पण निवडणुकीनंतर ते कोणत्या पक्षासी संधान बांधतील, हे सांगता येत नाही. असे असले तरी त्यांना यावेळी मुख्यमंत्रीपद मिळवणे अवघड जाईल.

प्रशांत किशोर यांची जेडीयूमधून २०२० साली हकालपट्टी झाली होती. त्यानंतर ते सातत्याने नितीश कुमार यांच्याविरोधात टिकास्र सोडत आले आहेत. नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर नितीश कुमार वगळून कुणीही मुख्यमंत्री व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. “तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या, जर मी चुकीचा ठरलो, तर मी राजकारण सोडून देईन”, असे प्रशांत किशोर यांनी चंपारण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.