मोठा दावा : अधिवेशनाआधी या मंत्र्याचा राजीनामा होणार
-अजितदादानी पूर्वीच राजीनामा घेतला
प्रतिनिधी
बीड : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे आरोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे. यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होणार आहे, असा खळबळजनक दावा करुणा शर्मा यांनी केला आहे. त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. 3-3-2025 ला राजीनामा होणार, असे करुणा शर्मा यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा दोन दिवसांपूर्वीच झालेला आहे, असा दावाही करुणा शर्मा यांनी केला आहे.
करुणा शर्मा यांनी नुकतंच टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दलची मोठा खुलासा केला आहे. मला १०० टक्के याबद्दलची माहिती मिळालेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दोन दिवस आधीच घेतला गेला आहे. वाल्मिक कराड जर दोषी असेल तर मी स्वत: राजीनामा देईन, असे सांगितले होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर काहीही राहिलेले नाही. त्यामुळे उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होईल, असे करुणा शर्मा म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला आहे. ते अजून जाहीर का झालेले नाही, याबद्दलची माहिती नाही. पण काल एसआयटी, सीआयडी चौकशीचा अहवाल समोर आला आहे. त्यामुळे १०० टक्के उद्या अधिवेशनाआधी त्यांचा राजीनामा होणार आहे, असा दावा करुणा शर्मा यांनी केला आहे


