मैदान मारणार! नागपुरातील वज्रमुठ सभेचा मार्ग मोकळा
-उच्च न्यायालयाकडून दिलासा
-सद्भावना नगर क्रीडा मैदानाताच सभा
गजानन ढाकुलकर
नागपूर : महाविकास आघाडीच्या नागपुरातील वज्रमुठ सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. मैदानावर सभेला परवानगी देऊ नये यासाठी भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांच्या मार्गदर्शनात स्थापन झालेल्या दर्शन काॅलनी सद्भावना नगर क्रीडा मैदान बचाव समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
13 एप्रिलला न्या. अतुल चांदुरकर व न्या. महेंद्र चांदवानी यांच्या खंडपीठासमोर याचिका सुनावणीसाठी आली असता पुढील सुनावणी 24 एप्रिलला ठेवण्यात आली. पोलिसांनी सभेला यापूर्वीच परवानगी दिल्यामुळे सभा 16 एप्रिल रोजी होणार आहे.
या सभेसाठी काँग्रेसचे माजी नगर सेवक तानाजी वनवे यांनी अर्ज केला होता. मात्र,समितीने न्यायालयात याचिका दाखल करताना कोणालाही प्रतिवादी केले नव्हते. न्यायालयाने ही बाब याचिकाकर्त्याच्या लक्षात आणून दिली. नियमानुसार याचिकेत प्रतिवादी असणे गरजेचे आहे. त्यानंतर तानाजी वनवे यांना प्रतिवादी करा असे निर्देश देत त्यांना नोटीस देण्यात आली. अटी व शर्तीनुसार सभा झाली की नाही यावर पुढील सुनावणी 24 रोजी ठेवण्यात आली.
समितीचे कार्यकर्ते धीरज शर्मा, यांच्यासह इतर तीन जणांनी याचिका दाखल केली होती. अॅड. रजत माहेश्वरी व अॅड. पलाश चकोले हे वकील होते. भाजपचेच आमदार कृष्णा खोपडे यांचा सभेला विरोध कायम आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांना पुढे करुन आंदोलन सुरू केले आहे. मात्र या विरोधाला न जुमानता सभेचे मुख्य संयोजक सुनील केदार तसेच शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह नेत्यांनी मैदानाची पाहाणी करीत सभा होणारच हे स्पष्ट केले.
काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी या भागात सभेला कोणाचाही विराेध नाही. उलट उद्धव ठाकरे, अजित पवार आदींना ऐकण्यास लोक उत्सुक असल्याने सभा होईल, असे ठणकावून सांगितले. हनुमान चालीसा पठणासह मैदानावर समितीतर्फे वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहे. महाविकास आघाडीची नागपूरला 16 एप्रिलला सभा आहे.
या सभेला भाजपानेच वारेमाप प्रसिद्धी मिळवून दिल्याने महाविकास आघाडीचे काम सोपे झाले आहे. त्यामुळे सभेच्या मैदानावरून भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सभेला केलेला विरोध वाया गेल्याची टीका केली आहे.


