मविआतील नेत्याच्या पक्ष प्रवेशावरून भाजपाला सवाल
-जिल्ह्यातील वातावरण तापण्याची श्यकता
प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जरा महायुती सरकारवर टीका केली की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना विकास विरोधी ठरवते, पण याच पक्षाच्या नेत्यांना मात्र भाजप वाजत गाजत पक्षात प्रवेशही देते. हिंगणा विधासभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या , जि.प.च्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचा शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.
प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे आक्रमकपणे विरोधकांचा समाचार घेतात. पक्षात अनेक प्रवक्ते आहेत. पण नागपुरात ते स्वत:च सर्व मुद्यांवर माध्यमापुढे भूमिका मांडतात. विरोधकांच्या टिकेला उत्तर देतात. काही आठवड्यापूर्वी त्यांनी मविआ नेत्यांना विकास विरोधी असल्याची टीका केली होती. महायुती सरकार विकसाच्या वाटेवर चालले असताना विरोधकांना ते सहन होत नाही, म्हणून ते टीका करतात, असे ते म्हणाले होते.
एकीकडे भाजप विरोधकांनी केलेली कोणतीही टीका सहन करीत नाही, दुसरीकडे मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले जातात. नागपूर जिल्ह्यात हिंगणा मतदारसंघात भाजपला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक महिला नेत्याला आपल्या पक्षात आणण्यात यश आले.


