भाजपाच्या या मुख्यमंत्र्यांनी कुणाला म्हटले, पप्पू, टप्पू आणि अप्पू ?

भाजपाच्या या मुख्यमंत्र्यांनी कुणाला म्हटले, पप्पू, टप्पू आणि अप्पू ?

-सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप

प्रतिनिधी
बिहार : बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी बिहारच्या दरभंगा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेतून त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. योगींनी महाआघाडीच्या या तिन्ही नेत्यांची तुलना माकडांशी केली. त्यांच्या या टीकेला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

दरभंगा येथील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, तुम्ही महात्मा गांधी यांच्या तीन माकडांबद्दल ऐकले असेलच. त्यांनी या माकडांना वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका, असा सल्ला दिला होता. तशीच तीन माकडे आता महाआघाडीत सामील झाली आहेत. ही तिन्ही माकडे पप्पू, टप्पू आणि अप्पू (राहुल, तेजस्वी आणि अखिलेश) आहेत.पप्पू चांगले बोलू शकत नाही, टप्पू चांगले पाहू शकत नाही आणि अप्पू सत्य ऐकू शकत नाही. म्हणूनच ते बिहारमध्ये झालेल्या विकासकामांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून अपप्रचार करीत आहेत. यावेळी योगींनी महाआघाडीतील नेत्यांवर माफियांशी हातमिळवणी करणे आणि राज्यात जातीत तेढ निर्माण केल्याचा आरोप केला.