बिहारमध्ये भाजपा बॅकफूटवर : केंद्रात युतीतील या पक्षाची वेगळी चूल !

बिहारमध्ये भाजपा बॅकफूटवर : केंद्रात युतीतील या पक्षाची वेगळी चूल !

-प्रशांत किशोर यांचे मोठे भाष्य

प्रतिनिधी
बिहार : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिहार निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात दोन टप्प्यांत निवडणुका होतील. ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होईल आणि १४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. विविध राजकीय पक्ष निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.

नितीश कुमार, तेजस्वी यादव, प्रशांत किशोर आणि चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहरे आहेत. आता चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या युतीची चर्चा सुरु आहे. सूत्रांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे, बिहारमधील भाजपाचे गणित बिघडेल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पुढील महिन्यात पार पडणाऱ्या बिहार निवडणुकीसाठी चिराग पासवान आणि प्रशांत किशोर यांच्या युतीची शक्यता नाकारता येत नाही, कारण राजकारणात दरवाजे नेहमी उघडे असतात,” असे लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) सूत्रांनी मंगळवारी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.
एलजेपी आणि सत्ताधारी भाजपा यांच्यात जागावाटपावर चर्चा सुरू असताना, पासवान आणि निवडणूक रणनीतिकार-राजकारणी किशोर यांच्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भरभरून यश मिळालेले चिराग पासवान यंदाच्या निवडणुकीत बिहारच्या एकूण २४३ विधानसभा जागांपैकी ४० जागांची मागणी करत असल्याची माहिती आहे, तर भाजपा फक्त २५ जागा देण्यास तयार आहे. परंतु, असे असले तरी ही युती होण्याची शक्यता फार कमी आहे. यावर स्वतः प्रशांत किशोरदेखील बोलले आहेत.

काय म्हणाले प्रशांत किशोर?
‘नवभारत टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर यांना या युती संदर्भात प्रश्न करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मी डाळ-भात खाणारा व्यक्ती आहे, खिचडी खाणारा नाही. मी खिचडी खात नाही आणि बनवत सुद्धा नाही. चिराग पासवान यांचे मी नेहमीच कौतुक केले आहे आणि अजूनही करतो, कारण ते बिहारमध्ये धर्म आणि जातीचे राजकारण करत नाहीत.”

प्रशांत किशोर पुढे म्हणाले, “परंतु,चिराग पासवान भाजपाबरोबर लढत आहेत. चिराग पासवान बिहारबद्दल बोलतात पण त्यासाठी उभे राहत नाहीत. जर त्यांनी एनडीएच्या बाजूने निवडणूक लढवली तर ते आणि आम्ही आमने-सामने असू. त्यांना २० जागा मिळतील की २५ जागा मिळतील, हे आम्हाला माहित नाही, पण त्यांना कितीही जागा मिळाल्या तरी ते आणि आम्ही आमने-सामने असू. मग, इथे तडजोड करण्याचा प्रश्नच कुठे येतो?,” असे ते म्हणाले आणि युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला. राजकीय समीकरणे बघताही ही युती होणे शक्य असल्याचे दिसत नाही.