बच्चू कडू का म्हणाले, आता कुठे गेला स्वाभिमान
-सर्वच राजकीय पक्षांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय
प्रतिनिधी
अमरावती : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचेही सत्र सुरू झाले आहे. भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही कार्यकर्त्यांनी गुरूवारी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची भेट घेतली. सर्वच राजकीय पक्षांकडून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला जातो. बाहेरच्या लोकांना उमेदवारी दिली जाते. या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का, असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
भाजपमध्ये सावळागोंधळ सुरू आहे. बायको भाजपमध्ये आहे, तर नवरा युवा स्वाभिमान पक्षात आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. आता राणा दाम्पत्याचा स्वाभिमान कुठे गेला, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.
बच्चू कडू म्हणाले, सतरंज्या उचलण्यासाठी राजकीय पक्षांना कार्यकर्ते लागतात. निवडणुका आल्या की त्यांना पैसेवाले दिसतात. पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्यांना डावलले जाते. अमरावती जिल्ह्यात माजी आमदार अरूण अडसड यांचे पूत्र प्रताप अडसड हे एक मूळ भाजपचे आमदार सोडले, तर इतर सर्व आमदार हे दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे, तिवसाचे आमदार राजेश वानखडे, मोर्शीचे आमदार उमेश यावलकर, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे, मेळघाटचे आमदार केवलराम काळे हे मूळचे भाजपचे आहेत का. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे, तरीही निष्ठावान कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची ताकद भाजप ठेवत नाही. सत्ता आली, तरी कार्यकर्त्यांना काहीच मिळत नाही. पुन्हा सतरंज्या उचलायच्या आणि तेही काँग्रेसवाल्यांच्या अशी विचित्र स्थिती भाजपमध्ये सध्या आहे.
बच्चू कडू म्हणाले, भाजपमध्ये जी मस्ती आली आहे, ती आता कार्यकर्त्यांनाच ठेचावी लागणार आहे. विधानसभेपर्यंत ठीक आहे. पण आता महापालिका निवडणुकीतही भाजप जर निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी देत नसेल, तर तुमची मर्दानगी कुठे गेली. केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना तुम्ही तुमच्या पक्षातील नगरसेवक निवडून आणू शकत नाही. तुम्हाला बाहेरचे लोक उसणे आणावे लागतात. याची लाज वाटली पाहिजे. भाजपमध्येही आता अ आणि ब असे दोन गट झाले आहेत. युवा स्वाभिमान पक्ष तर वेगळा लढत आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा भाजपमध्ये आहेत. रवी राणा युवा स्वाभिमानचा झेंडा घेऊन लढत असेल, तर काय होणार. सामान्य कार्यकर्त्यांचे यात मरणच होणार आहे. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अन्यायग्रस्त कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत.


