बच्चू कडू आक्रमक : का म्हणाले ते सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल ?

बच्चू कडू आक्रमक : का म्हणाले ते सहा मजले सुधारले तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल ?

-सेवाग्राम येथे दिव्यांगाच्या दारी अभियान

प्रतिनिधी
वर्धा : आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्या मंत्रालयात बसतात, त्या मंत्रालयाचे सहा मजले जरी भ्रष्टाचारमुक्त केले, तर अख्खा महाराष्ट्र सुधारेल, असे ठाम मत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी वर्ध्यातील सेवाग्राम येथे दिव्यांगाच्या दारी अभियान राबविले जात आहे. या अभियानाची सुरुवात शुक्रवार (१३ ऑक्टोबर ) आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. सत्ता कोणत्याही पक्षाची असो.  मंत्रालयामधील भ्रष्टाचार काही केल्या थांबत नाही, असा आरोप नेहमीच होतो. आता या आरोपाला सत्ताधारी पक्षातीलच मंत्र्याचा दर्जा असलेल्या एका नेत्याने दुजोरा दिला आहे.

बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी बच्चू कडू यांनी  मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे ट्रिपल इंजिन सरकारही मंत्रालयातील भ्रष्टाचार थांबवू शकलेले नाही, हे अधोरेखित झाले आहे.