बच्चू कडूंना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्याची प्रतिमा खराब असे…!
-आमदार बच्चू कडू तरीही आक्रमक
प्रतिनिधी
अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू सध्या प्रचंड आक्रमक झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर बच्चू कडू यांच्या पक्षाचे उमेदवार दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी प्रहार पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेची परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी 21 आणि 22 तारीख देण्यात आली होती. पण त्यांची सभा झाली नाही. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 24 एप्रिलला सभा आयोजित करण्यात आली आहे. पण प्रशासनाकडून बच्चू कडू यांच्या पक्षाला 23 आणि 24 एप्रिल तारखेला सायन्स कोर मैदानावर सभेसाठी परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे बच्चू कडू आज सायन्स कोर मैदानावर दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. यानंतर बच्चू कडू यांनी मैदानावरच ठिय्या मांडला. बच्चू कडू यांना समजवण्याचा पोलिसांनी प्रचंड प्रयत्नही केले. पण बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्या या भूमिकेवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
निवडणुकीत प्रचारामध्ये सगळ्या गोष्टी होत असतात. पण वैयक्तिक किंवा असा संघर्ष होता कामा नये. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. बच्चू कडू यांच्याशी मी स्वत: बोललोय. शेवटी आपण निवडणूक निवडणुकीच्या वातावरणात लढली पाहिजे. खेळाडू वृत्ती असली पाहिजे. संघर्ष होऊ नये. अमित शाह यांची सभा ठरली आहे. आम्ही देखील तिथे जाणार आहोत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
–देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
“मुख्यमंत्र्यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलं आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आम्ही राजकीय विरोधक आहोत. बच्चू कडू आमच्यासोबत होते. पण आता त्यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. त्यामुळे अशाप्रकारची कुठलीही भूमिका घेऊ नये, ज्यामुळे राज्याचं नाव खराब होईल. अमरावतीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा झाली. त्यावेळेस आमच्या पक्षाने या मैदानाची परवानगी मागितली होती. आमच्या पक्षाला सांगितलं की, त्यांची सभा आहे. तर आम्ही सोडून दिलं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


