पावसाळी अधिवेशन : तिसरा दिवशी किरीट सोमय्यावर झाली ही कारवाई

पावसाळी अधिवेशन : तिसरा दिवशी किरीट सोमय्यावर झाली ही कारवाई

-सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. भाजपचे माजी खासदार व विरोधकांवर सातत्याने आरोप करून त्यांना अडचणीत आणणारे किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओमुळे सध्या अडचणीत सापडले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषद तसेच विधानसभेतही किरीट सोमय्यांचा मुद्दा गाजला. आजदेखील या मुद्दयावरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.

किरीट सोमय्यांविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओप्रकरणी किरीट सोमय्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. या आंदोलनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यासह मविआचे आमदार उपस्थित होते.

महिलाविरोधी कलंकीत घटनाबाह्य सरकारचा निषेध असो’, अशा आशयाचे फलक विरोधकांनी झळकावले आहेत. त्यामुळे आजही अधिवेशनात किरीट सोमय्यांचाच मुद्दा केंद्रस्थानी राहणार, असे दिसत आहे.

तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, किरीट सोमय्या यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करायला हवी. राज्यात कानुनव्यवस्थेचे रोज धिंडवडे निघत आहेत. मात्र, राज्य सरकार केवळ तमाशा पाहत आहे. गुंडावर कोणताही वचक राहीलेला नाही. महिलांविरोधातील अत्याचारात रोज वाढ होत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी ही भुषणावह बाब नाही. त्यामुळे किरीट सोमय्यांसारख्या प्रकरणावर राज्य सरकारने तातडीने कारवाई करायला हवी.

राज्यात पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या, शेतकऱ्यांना अजूनही अतिवृष्टीची न मिळालेली नुकसान भरपाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव यावरूनही महाविकास आघाडीचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सोमय्या प्रकरणाची चौकशी

किरीट सोमय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओचा एका वृत्तवाहिनीने भंडाफोड केला होता. त्यानंतर उद्धवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू केली. विधान परिषदेतही मंगळवारी त्याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्यांवर अनेक महिलांचे शोषण केल्याचा गंभीर आरोप करत त्यांचे कथित 8 तासांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेनड्राइव्ह उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर केला. त्याची गांभीर्याने दखल घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करणार असल्याची घोषणा केली. उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘हे व्हिडिओ पाहणे माझ्यासाठी कठीण आहे, पण डॉक्टर, महिला पोलिसांना सांगून त्यांचे मत घेतले जाईल. वृत्तवाहिन्यांनीही व्हिडिओ दाखवताना काळजी घ्यायला हवी.’

शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. ‘शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी, शेतकरी विरोधी, शेतकऱ्यांवर अन्याय, करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ‘शासन आपल्या दारी, बळीराजा कर्जबाजारी, शासन आपल्या दारी, कृषिमंत्र्यांच्या बोगस धाडी, शासन आपल्या दारी एकही योजना नाही खरी, शासन आपल्या दारी खते व बियाणांच्या किमती भारी, शासन आपल्या दारी, कांद्याला भाव नसल्याने त्रस्त शेतकरी, सरकार त्रस्त सरकार पक्ष फोडण्यात व्यस्त’ अशा आशयाचे फलक झळकावत विरोधकांनी जोरदार आंदोलन केले. दिवसाला सात आत्महत्या होत असल्याचे आरोप करत विरोधकांनी फलकाच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे या संपूर्ण अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा विरोधक लावून धरणार असे संकेत आहेत.

नीलम गोऱ्हेंचा कारभार काढून घ्या
7 जुलै रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धवसेनेतून (उद्धव ठाकरे गट शिवसेना) शिंदेसेनेत (शिवसेना) उडी घेतली. त्यामुळे त्यांच्याकडून उपसभापतिपदाचा कार्यभार काढून घ्यावा, अशा जोरदार हालचाली सुरू झाल्या. विधान परिषदेत विरोधकांनी मंगळवारी आक्रमक पवित्राही घेतला. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे गोऱ्हेंच्या पदावरील गंडांतर तूर्तास टळले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह काही विरोधी सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर विधान परिषदेत चर्चा झाली. आजदेखील या मुद्द्यावरून विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हे यांना घेरण्याचा प्रयत्त करणार आहेत.