पारवेंविरुद्ध खासदार तुमाने यांची नाराजी उघड : सभेला दांडी, नाराजीनाट्य कायम
-हिंगण्याच्या सभेतील अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय
गजानन ढाकुलकर
नागपूर (हिंगणा) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभा मतदार संघातील हिंगणा विधानसभा मतदारसंघातील रेणुका सभागृहात महायुतीच्या सर्व घटक पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक शनिवारी (३० मार्च) पार पडली. मात्र, या बैठकीला विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची अनुपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे उमेदवार राजू पारवे यांच्याविरुद्ध पक्षातील काही गट सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीने काँग्रेसचा उमेदवार आयात केल्याने भाजपचे अनेक इच्छुक उमेदवार अद्यापही नाराज आहेत. पाच वर्षे भाजपकरिता काम करायचे आणि निवडणुकीत दुसऱ्यासाठी मतदान मागायचे, हे पटले नसल्याने अनेकांनी रामटेकच्या प्रचारातून काढता पाय घेतला आहे, असे समजते.
महायुतीमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. २५ वर्षांपासून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे. यावेळी तो मिळवण्याची संधी भाजपला होती. भाजपच्या नेत्यांनीही शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. येथील वाटाघाटी आणि हालचाली बघून भाजपच्या अनेक इच्छुकांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छा जागृत झाल्या होत्या. काहींची दोन वर्षांपासून तयारी सुरू आहे. अनेकांनी नेत्यांमार्फत फिल्डिंगही लावली होती. काहींनी अप्रत्यक्षपणे भेटीगाठींचे सत्र सुरू करून प्रचाराला सुरुवातदेखील केली होती. मात्र, राजू पारवे यांच्या प्रवेशाने इच्छावर पाणी फेरले. त्यातही शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांची मोठी नाराजी आहे. त्यामुळे ही नाराजी अशीच कायम राहिल्यास मोठा फटका पारवे यांना बसून बॅकफूटवर जाण्यास वेळ लागणार नाही, अशीही श्यकता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे उमरेडात काल (३०मार्च ) महाविकास आघाडीची उमेदवार श्यामकुमार बर्वे यांच्यासाठी भव्य रॅली पार पडली. या रॅलीत भाजपा व शिंदे सेनेचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाल्याने पारवेविरोधात त्यांना गृह मतदार संघातच किती नाराजी आहे, हे उघड होत आहे.
दुसरीकडे हिंगण्याच्या बैठकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी तण-मनाने काम करा व त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आमदार समीर मेघे यांनी कार्यकर्त्यांना केले. याप्रसंगी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ.राजीव पोतदार, महायुतीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


