नाना पटोलेना काय वाटतंय भीती, पावसाळी अधिवेशनात
-अजित पवारांच्या बंडामुळे विरोधी पक्ष नेते पद
प्रतिनिधी
नागपूर : आधी एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवारांच्या बंडामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आपसूक चालून आले आहे. तरीही १७ जुलैपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवाय होण्याची भीती काँग्रेसला वाटत आहे.
राज्यस्तरीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या या पदावर कुणाला नेमावे, असा यक्षप्रश्न काँग्रेसपुढे आहे. सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवू शकेल अशा नेत्याचा शोध सुरू आहे. असा नेता तत्काळ सापडणे कठीण आहेच. शिवाय काँग्रेसकडून नाव गेले तरी त्याच्या नियुक्तीचे सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला की नाही, हे अध्यक्ष ठरवत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.
सत्ताधाऱ्यांवर सतत हल्लाबोल करत राहणे, सरकारच्या चुकांवर बोट ठेवणे, घोटाळे, गैरव्यवहार बाहेर काढणे, अशी विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षा असते. शिवाय त्याला विधिमंडळाच्या कामकाजाचा चांगला अनुभवही आवश्यक असतो. कायदे-नियमांचा अभ्यास करण्याची तयारी लागते.
नाना पटोले वगळता अन्य कुणी या निकषात बसणे कठीण आहे. पण नानांकडे प्रदेशाध्यक्षपद असल्याने दुसरा कुणीतरी नेता काँग्रेसला शोधावा लागणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण अभ्यासू असले तरी आक्रमक नाहीत. महत्त्वाचे म्हणजे दोघांचे पटोलेंशी पटत नाही. राहुल गांधीही त्यांना संधी देण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
मविआ सरकारच्या काळात नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्या जागी राहुल गांधी यांनी कुणालाही संधी दिली नव्हती. आता पटोले विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरवण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. राहुल गांधींनी नाव निश्चित केले. तर त्या नावाला शरद पवार, उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाल्यावरच पटोलेंना विधान परिषदेत सभापतींना आणि विधानसभेत अध्यक्षांना तसे पत्र द्यावे लागेल. मगच अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. तसेही विरोधी पक्षनेता जाहीर करणे हे अध्यक्षांच्या मनावर आहे. याशिवाय ते घटनात्मक पद नाही तर संसदीय परंपरा आहे. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षनेता नसला तर नकोच आहे. राष्ट्रवादीत विभाजन झाले की नाही हे ठरवल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होईल. पण, राष्ट्रवादीत विभाजन झाले की नाही हे अध्यक्ष याच अधिवेशनात ठरवण्याची शक्यता कमीच आहे. “माझा विचार चालला आहे. मी अभ्यास करीत आहे,’ असे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर सांगू शकतात.


